औरंगाबाद : मुंबईची सलामीवीर जेमिमा रॉड्रिग्जरूपी वादळाने जिल्हा क्रिकेट संघटनेचे स्टेडियम दणाणून सोडत १६३ चेंडूंतच नाबाद २०२ धावांचा पाऊस पाडला. तिच्या या चौफेर टोलेबाजीच्या बळावर मुंबई संघाने रविवारी एडीसीए मैदानावर झालेल्या १९ वर्षांखालील महिलांच्या पश्चिम विभागीय क्रिकेट स्पर्धेत सौराष्ट्र संघावर तब्बल २८५ धावांनी विजय मिळवला.
या स्पर्धेत तिचे हे दुसरे शतक आहे. याआधी तिने १ नोव्हेंबर रोजी गुजरात संघाविरुद्ध १४२ चेंडूंतच १८ चौकारांसह १७८ धावांची वादळी खेळी केली होती. रविवारी मुंबई संघाची कर्णधार जेमिमा रॉड्रिग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही आणि तिस-याच षटकांत हिरल राठोडने सलामीवीर पूजा यादवला १३ धावांवर त्रिफळाबाद केले. त्यानंतर मात्र, नेत्रदीपक स्क्वेअर कट, डोळ्यांचे पारणे फेडणारे स्ट्रेट ड्राइव्ह आणि कव्हर ड्राइव्ह मारणा-या जेमिमा रॉड्रिग्जने सेजल राऊत हिला साथीला घेत सौराष्ट्राच्या गोलंदाजीवर प्रतिहल्ला करताना त्यांना सावरण्याची संधीच मिळू दिली नाही.
तिने संयमी खेळी करणा-या सेजल राऊत हिच्या सोबत दुस-या गड्यासाठी २५९ चेंडूंतच ३०० धावांची भागीदारी करताना प्रथम फलंदाजी करणा-या मुंबईला ५० षटकांत २ बाद ३४७ अशी मजल मारून दिली. जेमिमाने अवघ्या १६३ चेंडूंत २१ सणसणीत चौकार मारताना नाबाद २०२ धावांची खेळी केली. तिला साथ देणा-या सेजल राऊत हिने ११४ चेंडूत २ चौकारांसह ९८ धावांची धीरोदात्त खेळी केली. सौराष्ट्रकडून हिरल राठोडने ६१ धावांत १ गडी बाद केला.
प्रत्युत्तरात सौराष्ट्रचा संघ ३९.४ षटकांत ६२ धावांत गारद झाला. सौराष्ट्रकडून मेघना जाम्बुचा हीच (२५) दुहेरी आकडी धावसंख्या गाठू शकली. मुंबईकडून सायली सातघरे हिने २० धावांत ३ गडी बाद केले. तिला जान्हवी काटे व फातिमा जाफर यांनी प्रत्येकी २ गडी बाद करीत साथ दिली. वृषाली भगतने १ गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
मुंबई : ५० षटकांत २ बाद ३४७. (जेमिमा रॉड्रिग्ज नाबाद २०२, सेजल राऊत ९८. हिरल राठोड १/६१).
सौराष्ट्र : ३९.४ षटकांत सर्वबाद ६२. (मेघना जाम्बुचा २५. सायली सातघरे ३/२०, जान्हवी काटे २/१९, फातिमा जाफर २/१०, वृषाली भगत १/४).