Join us  

दिसतं तसं नसतं! जसप्रीत बुमराहने केला लसिथ मलिंगाबाबत मोठा खुलासा

या जोडीबद्दल काही अफवाही पसरल्या आहेत. या अफवांचे आज बुमराहने खंडन केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 7:15 PM

Open in App

मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा ही जोडगोळी एकत्रपणे आयपीएलमध्ये पाहायला मिळाली. या दोघांनी मुंबई इंडियन्सकडून खेळताना भेदक मारा केला. पण या जोडीबद्दल काही अफवाही पसरल्या आहेत. या अफवांचे आज बुमराहने खंडन केले आहे.

बऱ्याच चाहत्यांना असे वाटते की बुमरा हा मलिंगासारखाच यॉर्कर टाकतो. त्यामुळे बुमराहला यॉर्कर कसा अचूक टाकता येईल, हे मलिंगाने शिकवले आहे. पण ही गोष्ट चुकीची आहे. याबाबतचा खुलासा आज बुमराहने केला आहे.

बुमराह म्हणाला की, "  लहानपणी गल्लीमध्ये मी बरेच क्रिकेट खेळलो आहे. त्यावेळी आम्ही रबरी चेंडूने क्रिकेट खेळायचो. या चेंडूला सीमही चांगली असायची. पण हा चेंडू स्विंग व्हायचा नाही. त्यावेळी जर फलंदाजाला बाद करायचे असेल तर त्यासाठी सर्वोत्तम पर्याय हा यॉर्कर असायचा. त्यावेळी मी यॉर्कर टाकायला शिकलो."

बुमराह पुढे म्हणाला की, " मला कोणत्या खेळाडूने जास्त काही यॉर्करबाबत शिकवले नाही. मी टीव्हीवर बरेच सामने पाहायचो. तेव्हा मी काही महान गोलंदाज कशी गोलंदाजी करायचे ते आवर्जुन पाहायचो. टीव्हीवर गोलंदाजीबघून मी बरंच काही शिकलो आहे."

मलिंगाबद्दल बुमराह म्हणाला की, " मी आणि मलिंगा एकत्रितपणे बरेच सामने खेळलो आहोत. त्यामुळे दोघांमध्ये चांगलाच समन्वय पाहायला मिळतो. मैदानात कोणती परिस्थिती कशी हाताळायची, हे मला मलिंगाने शिकवले. त्याचबरोबर फलंदाजाच्या मानसीकतेचा विचार कसा करायचा, हेदेखील मलिंगाने मला सांगितले आहे."

टॅग्स :जसप्रित बुमराहलसिथ मलिंगामुंबई इंडियन्सआयपीएल