भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्याचा दुसरा दिवस खूपच रोमांचक ठरला. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात ३८७ धावा करून सर्वबाद झाल्यानंतर भारताने पहिल्या डावात ३ विकेट्स गमावून १४५ धावा केल्या. इंग्लंडचा पहिला डाव गुंडाळण्यात जसप्रीत बुमराहने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने पाच विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे, ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर बुमराहने पहिल्यांदाच पाच विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर बुमराह प्रेस कॉन्फ्रेंसदरम्यान पूर्णपणे वेगळ्या शैलीत दिसला.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जसप्रीत बुमराह भारताकडून पत्रकार परिषदेला आला. प्रेस कॉन्फ्रेंसदरम्यान बुमराह पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देत असताना एका पत्रकाराला त्याच्या पत्नीने फोन केला. बुमराहने फोन पाहिला आणि कोणाची तरी पत्नी फोन करत आहे, मी उचलत नाही, असे तो म्हणाला. यानंतर प्रेस कॉन्फ्रेंसला उपस्थित असलेले सगळेच हसू लागले.
लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हापर्यंत भारतीय संघाने त्यांच्या पहिल्या डावात ३ विकेट्स गमावून १४५ धावा केल्या. केएल राहुल (नाबाद, ५३ धावा) आणि ऋषभ पंत (नाबाद १९ धावा) फलंदाजी करत आहेत. आजचा दिवसाचा खेळ टीम इंडियासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. सध्या भारत २४२ धावांनी मागे आहे. अशा परिस्थितीत केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्यावर खांद्यावर मोठी जबाबदारी असेल. आतापर्यंत या मालिकेत अद्भुत फलंदाजी करणाऱ्या भारताचा कर्णधार शुभमन गिलने लॉर्ड्स कसोटी सामन्यात पहिल्या डावात फक्त १६ धावा काढून ख्रिस वोक्सच्या चेंडूवर बाद झाला.