भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात केवळ १६२ धावांवर ऑलआऊट झाला. या कमी धावसंख्येत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने महत्त्वाची भूमिका बजावत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
जसप्रीत बुमराहने वेस्ट इंडिजविरुद्धच्या या डावात सलामीवीर जॉन कॅम्पबेल, जस्टिन ग्रीव्हज आणि जोहान लिन यांना बाद केले आणि एकूण तीन विकेट्स घेतले. या तीन विकेट्ससह बुमराहने डब्लूटीसी स्पर्धेत भारतीय भूमीवर ५० विकेट्सचा टप्पा गाठला. डब्लूटीसीमध्ये घरच्या मैदानावर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय वेगवान गोलंदाज ठरला.
डब्लूटीसीमध्ये घरच्या मैदानावर ५० विकेट्स
भारताकडून फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी डब्ल मध्ये घरच्या मैदानावर ५० पेक्षा जास्त विकेट्स घेतले. बुमराहने डब्लूटीसीमध्ये घरच्या मैदानावर एकूण १३ कसोटी सामने खेळले आहेत आणि ५० विकेट्सचा टप्पा गाठला. या काळात त्याची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी ४५ धावांत ६ विकेट्स आहे.
कसोटी कारकिर्दीतील कामगिरी
जसप्रीत बुमराहने २०१८ मध्ये भारतासाठी कसोटी पदार्पण केले. आपल्या अचूक यॉर्करमुळे त्याची जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणना केली जाते. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ४९ कसोटी सामन्यांमध्ये एकूण २२२ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने १५ वेळा ५ विकेट्स घेण्याचा विक्रम रचला आहे.