- सुनील गावसकर लिहितात...
रविवारच्या सायंकाळी विश्वकप स्पर्धेत नवा चॅम्पियन ठरणार असल्याचे निश्चित आहे. इंग्लंड संघाने उपांत्य फेरीत आॅस्ट्रेलियावर पूर्णपणे वर्चस्व गाजविले. गेल्या तीन सामन्यांत यजमान संघाने नक्कीच आक्रमक कामगिरी केली.
हा सर्व चमत्कार जेसन रॉयच्या पुनरागमनामुळे घडला. तो ज्या लढतींमध्ये खेळला नाही त्या सामन्यांत संघाला पराभव स्वीकारावा लागला. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजांना वर्चस्व गाजविण्याची संधी मिळाली नाही. रॉयच्या अनुपस्थितीत संघ लक्ष्याचा पाठलाग करताना अडखळत असल्याचे दिसले; पण उपांत्य फेरीत या आक्रमक सलामीवीराने पहिल्या चेंडूपासून आपला निर्धार जाहीर केला. इंग्लंडची फलंदाजी अन्य संघांप्रमाणे एक किंवा दोन फलंदाजांवर अवलंबून नाही. त्यांच्या संघातील आठव्या क्रमांकाचा फलंदाज व्होक्सही चांगल्या धावा काढतो.
न्यूझीलंडला पुन्हा एकदा अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळाली आहे. हा असा संघ आहे की त्यांच्याकडे कुणी सुपरस्टार नाही.
ब्रॅन्डन मॅक्युलम असा एक फलंदाज होता की त्याच्या कामगिरीची विश्वक्रिकेटमध्ये चर्चा होत होती. केन विलियम्सन नक्कीच मॅक्युलमची भूमिका पुढे रेटत आहे. शांत स्वभावाचा हा खेळाडू कुठलाही दबाव न बाळगता स्वाभाविक कामगिरी करीत असतो.
ट्रेंट बोल्ट आपल्या भेदक माऱ्यासाठी ओळखल्या जातो. तो बळी घेण्यात माहिर आहे. पहिल्या उपांत्य लढतीत भारताला सुरुवातीला धक्के देणाºया मॅट हेन्रीवरही नजर राहील. रॉस टेलर विश्वविजेतेपदासह आपल्या कारकिर्दीचा समारोप करण्यास इच्छुक असेल.
यावेळी न्यूझीलंड विश्वचॅम्पियन ठरला तर चांगलीच बाब राहील.जर इंग्लंड विश्वचॅम्पियन ठरला, तर त्यांनी न्यूझीलंडला धन्यवाद द्यायला हवे. कारण गेल्या विश्वकप स्पर्धेतील लाजिरवाण्या कामगिरीनंतर त्यांनी न्यूझीलंडच्या आक्रमक शैलीची नक्कल करीत पुनरागमन
केले. एकूण विचार करता रविवारची अंतिम लढत तोच संघ जिंकेल जो चांगली कामगिरी करेल.