मुंबई : सतत दहशतवादी हल्ल्यांच्या सावटात असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये क्रीडा संस्कृती असेल याची कल्पनाच काही वर्षांपूर्वी कोणी केली नसावी. असं नाही की येथे क्रीडाक्षेत्राला वाव नाही, परंतु सतत भीतीच्या सावटाखाली असलेल्या या भागात असे भरारी घेणारे फार कमी आहेत. पण, येथील क्रीडाक्षेत्रात आता बरेच सकारात्मक बदल पाहायला मिळत आहे.
फुटबॉल, क्रिकेट, मॅरेथॉन आणि साहसी क्रीडा खेळात येथील खेळाडू आपली छाप पाडत आहेत. हीच सकारात्मक बाब लक्षात घेत आगामी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL) जम्मू-काश्मीर स्वतःचा संघ उतरवण्याच्या तयारीत आहे. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी तसे संकेत दिले आहेत. ते म्हणाले,'' जम्मू-काश्मीरचा संघ IPLमध्ये खेळवता येईल का, यासाठी मी अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यासोबत बोलण सुरू आहे. लवकरच आयपीएलचे सामने जम्मू-काश्मिरमध्येही पाहायला मिळतील.''
गेल्या काही वर्षांत जम्मू-काश्मिरने अनेक प्रतिभावान खेळाडू घडवले आहेत. जम्मू-काश्मिरमधील तीन क्रिकेटपटूंनी IPLच्या विविध क्लबचे प्रतिनिधित्व केले आहे. इथल्याच परवेज रसूलने भारतीय संघाचे दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारतीय संघाचे प्रतिनिधित्वही केले आहे. IPL मध्ये त्याने पुणे वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि सनरायझर्स हैदराबाद संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
त्याशिवाय मंझूर अहमद दार या जम्मू-काश्मिरच्या खेळाडूला किंग्ज इलेव्हन पंजाबने 2018च्या लिलावात 20 लाख रुपये मोजून आपल्या चमूत दाखल करून घेतले. मिथून मनहासही चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि पुणे संघाकडून खेळला आहे.