जम्मू-काश्मीरमधील क्रिकेटच्या मैदानातून एक धक्कादायक आणि वादग्रस्त प्रकार समोर आला. एका क्रिकेट लीगमध्ये फलंदाजीसाठी आलेल्या खेळाडूने आपल्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज लावल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संबंधित क्रिकेटपटू आणि आयोजकांना चौकशीसाठी बोलावले आहे.
सध्या जम्मूमध्ये जम्मू-काश्मीर चॅम्पियन्स लीग ही स्पर्धा सुरू आहे. बुधवारी जेके११ किंग्ज आणि जम्मू ट्रेलब्लेझर्स या दोन संघांमध्ये सामना रंगला होता. या सामन्यादरम्यान जेके११ किंग्जचा खेळाडू फुरकान भट्ट हा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र, त्याने घातलेल्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज लावलेला असल्याचे उपस्थितांच्या लक्षात आले. फुरकान भट्ट याने हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज लावून फलंदाजी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. खेळामध्ये अशा प्रकारे राजकीय किंवा आंतरराष्ट्रीय वादाचे मुद्दे आणल्यामुळे क्रीडाप्रेमींमधून संताप व्यक्त करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला.
या वादग्रस्त प्रकरणानंतर जम्मू ग्रामीण पोलिसांनी फुरकान भट्ट याला चौकशीसाठी बोलावले आहे. केवळ खेळाडूच नव्हे, तर लीगच्या आयोजकांनाही या प्रकरणी जाब विचारण्यात आला आहे. खेळात अशा प्रतीकांचा वापर करण्यामागे नक्की काय उद्देश होता आणि आयोजकांनी याकडे दुर्लक्ष का केले? या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. संपूर्ण जम्मू-काश्मीर चॅम्पियन्स लीग आता पोलिसांच्या देखरेखीखाली आली.
आयसीसी आणि इतर क्रिकेट मंडळांच्या नियमांनुसार, खेळाडूंच्या कपड्यांवर किंवा साहित्यावर कोणत्याही प्रकारचे राजकीय, धार्मिक किंवा वांशिक संदेश देणारे स्टिकर्स लावण्यास मनाई असते. जम्मू-काश्मीरमधील संवेदनशील परिस्थिती पाहता, या घटनेने राजकीय वळण घेण्यास सुरुवात केली आहे.