Join us

IPL 2022: जैस्वालची ‘यशस्वी’ खेळी; राजस्थान अखेरच्या षटकात विजयी

पंजाबने ५ बाद १८९ पर्यंत मजल गाठून राजस्थानला १९० धावांचे लक्ष्य दिले होते. त्यांनी १९.४ षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात विजयावर शिक्कामोर्तब केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 05:24 IST

Open in App

मुंबई : यशस्वी जैस्वालने अपयश मागे टाकून ६८ धावांची खेळी करताच आयपीएलमध्ये शनिवारी वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सवर अखेरच्या षटकात सहा गडी राखून विजय नोंदविला. या विजयामुळे राजस्थानने १४  गुणांसह प्ले ऑफकडे कूच केली, तर दहा गुण असलेल्या पंजाबचा प्ले ऑफ प्रवेश आणखी कठीण झाला आहे.

पंजाबने ५ बाद १८९ पर्यंत मजल गाठून राजस्थानला १९० धावांचे लक्ष्य दिले होते. त्यांनी १९.४ षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात विजयावर शिक्कामोर्तब केले. यशस्वीने ४१ चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकारांसह ६८ धावा ठोकल्या. पंजाबकडून अर्शदीपने चार षटकात २९ धावा देत दोन गडी बाद केले. अखेरच्या षटकात राजस्थानला आठ धावांची गरज होती. हेटमायरने उत्तुंग षटकार खेचल्यानंतर एकेरी धाव घेत विजय साजरा केला. .

 यशस्वीचे हे आयपीएलमधील दुसरे अर्धशतक आहे. संजू सॅमसन पुन्हा अपयशी ठरला. १२ चेंडूत २३ धावा काढणारा संजू ऋषी धवनच्या चेंडूवर शिखर धवनकडे झेल देत बाद झाला. १६ चेंडूत ३० धावा ठोकणाऱ्या वेगवान बटलरने चौथ्याच षटकात रबाडाच्या चेंडूवर २० धावा वसूल केल्या. पंजाबकडून जीतेश शर्माने चार चौकार आणि दोन षटकारांसह १८ चेंडूत ३८ धावा ठोकल्या. राजस्थानकडून युजवेंद्र चहलने शानदार मारा करीत चार षटकात २८ धावात तीन फलंदाजांना बाद केले. यावेळी पत्नी धनश्रीने चीअरअप करीत चहलचा उत्साह वाढविला. पंजाबचा सलामीवीर जॉनी बेयरेस्टो याने शानदार फलंदाजी करीत ४० चेंडूत ५६ धावा केल्या. यंदाच्या सत्रात त्याचे हे पहिले अर्धशतक आहे. यासोबतच टी-२० प्रकारात त्याने चार हजार धावांचा टप्पादेखील गाठला.

संक्षिप्त धावफलकपंजाब किंग्स : २० षटकात ५ बाद १८९ (जॉनी बेयरेस्टो ५६, भानुका राजपक्ष २७, मयंक अग्रवाल १५, जीतेश शर्मा नाबाद ३८, लिव्हिंगस्टोन २२) गोलंदाजी : युजवेंद्र चहल ३/२८, प्रसिद्ध कृष्णा १/४८, रविचंद्रन अश्विन १/३२. 

राजस्थान रॉयल्स : १९.४ षटकात ४ बाद १८९ धावा (यशस्वी जैस्वाल ६८, जोस बटलर ३०, संजू सॅमसन २३, देवदत्त पडिक्कल ३१) गोलंदाजी : अर्शदीपसिंग २/२९, कॅगिसो रबाडा १/५०, ऋषी धवन १/२५.

Open in App