नवी दिल्ली : बीसीसीआय सचिव जय शाह यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) अध्यक्षपदी शनिवारी सर्वसंमतीने निवड करण्यात आली. शाह हे बांगला देश क्रिकेट बोर्डाचे प्रमुख नजमूल हसन पापोन यांचे स्थान घेतील.
बीसीसीआय कोषाध्यक्ष अरुण धुमल यांनी ट्विटवर ही माहिती शेअर करीत शाह यांचे अभिनंदन केले. ‘एसीसी तुमच्या नेतृत्वात उच्च शिखर गाठेल शिवाय आशियातील खेळाडूंना लाभ होईल,’अशी अपेक्षा देखील व्यक्त केली.
एसीसीकडे आशिया चषक स्पर्धा आयोजनाची जबाबदारी असते. कोरोनामुळे २०२० च्या आशिया चषकाचे आयोजन पाकिस्तानमध्ये होणार होते. ते स्थगित झाल्यानंतर ही स्पर्धा श्रीलंका किंवा बांगला देशात होण्याची शक्यता आहे. आता शाह यांच्याकडे उपखंडातील या महत्त्वाच्या स्पर्धेच्या आयोजनाबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी राहणार आहे.