ढाका: महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर बांगलादेश क्रिकेट संघात मोठी खळबळ उडाली आहे. कर्णधाराने पराभवानंतर काही खेळाडूंना मारहाण केल्याचा गंभीर आरोप एका वरिष्ठ खेळाडूने केल्याने अवघे क्रिकेटविश्व हादरले आहे.
बांगलादेशच्या महिला संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज जहानआरा आलम हिने राष्ट्रीय कर्णधार निगार सुल्ताना ज्योती आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर कर्णधार निगार सुल्ताना हिने खेळाडूंशी गैरवर्तन केले, किंबहुना त्यांना मारहाण केली, असा जहानआराचा मुख्य आरोप आहे. या आरोपामुळे खळबळ उडाल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे.
'कर्णधाराने खेळाडूंना मारहाण केल्याचा' कोणताही प्रकार झालेला नाही. मात्र, खेळाडूंमधील अंतर्गत वाद आणि ड्रेसिंग रूममधील तणाव निश्चितपणे वाढला होता, असे बीसीबीने म्हटले आहे.
बीबीसीने केले मान्य
बीसीबीच्या महिला विंगचे प्रमुख शफिउल आलम चौधरी नाडेल यांनी कबूल केले की, विश्वचषकात संघाची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नाही आणि त्यानंतर खेळाडूंच्या गटांमध्ये काही अंतर्गत वाद झाले. तथापि, त्यांनी मारहाणीचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले. जहानआरा आलम हिने कर्णधार आणि संघ व्यवस्थापनावर नाराज होऊन थेट बीसीबीकडे तक्रार दाखल केली होती.
क्रिकेट बोर्डाचे पुढील पाऊल:
बीसीबीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, संघ व्यवस्थापनात सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. या आरोपांमुळे बांगलादेश क्रिकेटमध्ये एक मोठे वादळ निर्माण झाले आहे, ज्याचा परिणाम संघाच्या पुढील वाटचालीवर होण्याची शक्यता आहे.