IPL 2022 : आयपीएलने (IPL) अनेक खेळाडूंना एक मोठी संधी दिली आहे. असाच एक प्रतिभावान खेळाडू म्हणजे आकाशदीप. आकाशदीपनं रॉलय चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (RCB) गोलंदाजी करताना चांगली कामगिरी केली आहे. मात्र त्याचा एका छोट्या गावातून निघून आयपीएलपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये कशाप्रकारे अडचणींचा सामना करावा लागला याचा खुलासा आकाशदीपनं एका व्हिडीओमधून केला आहे. आरसीबीनं त्याचा हा प्रवास आपल्या सोशल मीडियावरून शेअर केलाय.
आरसीबीनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ अपलोड केलाय. यात आकाशदीपनं त्याचा इथवरचा प्रवास सांगितला आहे. आकाशदीप एका लहान गावातून पुढे आला आहे. आकाशदीपच्या कुटुंबीयांनी त्याला क्रिकेट खेळण्यासाठी पाठींबा दिला नाही. परंतु यामागे एक कारण असल्याचंही त्यानं सांगितलं.
"माझे वडिल एक शिक्षक होते आणि क्रिकेटसाठी त्यांनी कधीही पाठींबा दिला नाही. परंतु ते जेव्हा शाळेत जायचे तेव्हा मी लपून क्रिकेट खेळायचो," असं आकाशदीप म्हणाला. परंतु यामागे एक कारण असल्याचंही त्यानं सांगितलं. "जेव्हा माझ्या वडिलांना मी क्रिकेट खेळत असल्याची माहिती झाली, तेव्हा त्यांना माझ्या भविष्याबद्दल चिंता वाटू लागली. मी ज्या ठिकाणाहून आलो आहे, त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी क्रिकेट खेळलंय त्यांना यश मिळालं नाही. मी क्रिकेट खेळायचो तेव्हा ते नाराज व्हायचे. याकडे एक गुन्हा म्हणून पाहिलं गेलं," असंही त्यानं म्हटलं.
कुटुंबीयांकडून पाठींबा नसतानाही आकाशदीपनं क्रिकेट खेळणं सोडलं नाही. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यानं आपला आरसीबीपर्यंतचा प्रवास केला. विराट कोहली, एबी डे विलिअर्स या खेळाडूंमुळेच आपलं कायम आरसीबीसोबत खेळण्याचं स्वप्न राहिलं असल्याचंही तो म्हणाला.