कराची : महेंद्रसिंह धोनीनंतर भारतीय संघाची धुरा सांभाळणारा विराट कोहली याने फार कमी कालावधीत भारतीय संघावर स्वत:ची पकड मजबूत केली, शिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा निर्माण केला. आक्रमक फलंदाजीसह आक्रमक स्वभावासाठीही तो ओळखला जातो. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू राशिद लतिफ याने विराट कोहलीच्या आक्रमक स्वभावाचे कौतुक करीत पाकच्या गोलंदाजांनी विराटसोबत पंगा घेऊ नये, असा सल्ला दिला आहे.
काही खेळाडू असे असतात की त्यांच्याशी पंगा घ्यायचा नसतो. पाकिस्तानकडे जावेद मियाँदाद या प्रकारातले खेळाडू होते. व्हिव रिचर्ड्स, सुनील गावसकर यांच्यासोबत आता विराट कोहलीचे नाव या यादीत जोडले पाहिजे, असे लतिफने एका यू-ट्यूूब व्हिडिओला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली असून आयपीएलमध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे नेतृत्व करतो. (वृत्तसंस्था)
२०१४ साली भारत-आॅस्ट्रेलिया मालिकेदरम्यान धोनीने दोन कसोटी सामन्यांनंतर कसोटीमधून निवृत्ती स्वीकारली होती. या मालिकेत विराट कोहलीने दोन शतके झळकावली. एका सामन्यात आॅस्ट्रेलियाचा मिचेल जॉन्सन आणि विराट कोहलीमध्ये मैदानात चांगलीच जुंपली होती आणि त्यावेळी विराटची देहबोली ही पाहण्यासारखी होती. तो अजिबात बचावात्मक नव्हता, त्याच्या वागण्यात आक्रमकता होती. नुकत्याच विंडीजविरुद्ध मालिकेतही विराटने केजरिक विलियम्सला त्याच्याच शैलीत सडेतोड उत्तर देत, बोलती बंद केली होती. त्यामुळे सामन्यादरम्यान गोलंदाजांनी विराटशी पंगा घेऊ नये,’ असे आपले मत बनल्याचे लतिफने स्पष्ट केले.