मुंबई : ‘गेल्या दोन विश्वचषक स्पर्धांमध्ये भारतीय संघ मोक्याच्या वेळी दबावामध्ये आला. त्यामुळेच आता आॅस्टेÑलियामध्ये दबावाचा यशस्वीपणे सामना करण्याचे आव्हान असून त्यावरच संघाचे यश अवलंबून असेल,’ असे स्पष्ट मत भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने व्यक्त केले.
गुरुवारी भारतीय महिला संघ आॅस्टेÑलियाला रवाना झाला. मात्र त्याआधी कर्णधार हरमनप्रीत आणि प्रशिक्षक डब्ल्यू. व्ही. रमन यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याआधीच्या टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले होते. तसेच २०१७ साली ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांना थोडक्यात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
याबाबत हरमनप्रीत म्हणाली, ‘आम्ही गेल्या दोन्ही विश्वचषकांमध्ये जेतेपदाच्या खूप जवळ पोहोचलो होतो. पण, आता आम्हाला दबावाचा सामना करण्यास शिकले पाहिजे. गेल्या दोन विश्व स्पर्धांमध्ये आम्ही यामध्ये अपयशी ठरलो होतो. या वेळी आम्ही आमच्यावर दबाव घेण्याऐवजी खेळाचा जास्तीतजास्त आनंद घेऊ इच्छितो.’ स्वत:च्या खेळावर लक्ष केंद्रित करणे सर्वांत महत्त्वाचे असल्याचे सांगून हरमनप्रीत म्हणाली, ‘ही एक मोठी स्पर्धा असल्याचा विचार न करता आम्ही खेळू. आम्हाला सर्वोत्तम प्रदर्शन करायचे आहे; पण दबाव ओढवून घ्यायचा नाही. स्वत:च्या नैसर्गिक खेळावर लक्ष केंद्रित करून आम्ही संघाला कशा प्रकारे विजय मिळवून देऊ शकतो याचा विचार करावा लागेल.’
देशाकडून खेळणे वेगळी बाब - रमन
‘फ्रेंचाईजी लीगमध्ये खेळणे आणि देशाकडून खेळणे यामध्ये खूप फरक असल्याने टी२० विश्वचषक स्पर्धेत फ्रेंचाईजी लीग खेळणाऱ्या खेळाडूंना जास्त फायदा होईल, असे मला वाटत नाही,’ असे भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक डब्ल्यू. व्ही. रमन यांनी सांगितले.
कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्स या भारतीयांना आॅस्टेÑलियातील महिला बिग बॅश लीग स्पर्धेत खेळण्याचा अनुभव आहे. याबाबत रमन म्हणाले, ‘फ्रेंचाईजी लीग खेळणे आणि देशाकडून खेळणे यामध्ये मोठा फरक आहे.
खेळताना परिस्थिती कदाचित ओळखीची असेल, पण व्यासपीठ पूर्णपणे वेगळे असते; शिवाय दोन्ही बाजूंकडील दबावही वेगळा असतो.’ रमन पुढे म्हणाले, ‘फ्रेंचाईजी लीग खेळल्याचा मानसिकरीत्या नक्कीच फायदा होईल. गेल्या सत्राच्या सुरुवातीला आम्ही काही सामन्यांत चांगली कामगिरी केली नव्हती. पण, यानंतर संघ समतोल झाला आहे. सर्वच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असून, सर्व जणी फॉर्ममध्ये आहेत.’