नवी दिल्ली : ‘ईशांत शर्माबाबत कोणताही राग नाही. तो अजूनही मला माझ्या भावासारखाच आहे. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाही,’ अशी प्रतिक्रिया वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू डॅरेन सॅमी याने दिली.
आयपीएलदरम्यान गंमत म्हणून काही खेळाडू माझ्या वर्णावरुन हाक मारायचे, असा आरोप सॅमीने काही महिन्यापूर्वी केला होता. या खेळाडूंमध्ये ईशांतचाही समावेश असल्याचे नंतर कळाले. सॅमीने आरोप केला होता की, २०१४आणि २०१५ मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघासोबत असताना त्याला संघसहकारी नेहमी कालू नावाने हाक मारायचे. काही महिन्यापूर्वीच सॅमीला या नावाचा अर्थ कळाला होता आणि त्यानंतर त्याने ही गोष्ट सर्वांसमोर आणली.
ईशांत शर्माच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आलेल्य एका छायाचित्राच्या संदेशामध्ये या शब्दाचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे ईशांत अडचणीत आला. यानंतर नाराज झालेल्या सॅमीने या प्रकरणाबाबत माफी मागावी, अशी मागणी केली होती. मात्र नंतर त्याने नरमाईची भूमिका घेत चर्चा करण्यास सांगितले. सॅमीने वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हटले की, ‘या प्रकरणाबाबत मला कोणतीही नाराजी नाही. मी नंतर ईशांतसोबत संपर्क केला. मी आताही त्याला माझ्या भावासारखाच मानतो. मात्र पुन्हा जर त्या शब्दाने कुणी मला संबोधित केले, तर त्या व्यक्तीकडे मी नक्की विचारणा करेन. त्यावेळीही मी असेच केले होते.’