- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण
भारतात गुलाबी चेंडूने खेळल्या गेलेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटीमुळे उत्साहित आहो. ईडन गार्डन्सवर ५० हजार प्रेक्षकांच्या गर्दीने लढतीदरम्यान शानदार वातावरण कायम राखले. यामुळे मी खेळत असलेल्या दिवसांची आठवण ताजी झाली. विशेषत: अडचणीच्या स्थितीत असताना प्रेक्षकांच्या गर्दीमुळे ऊर्जा मिळत होती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला मैदानावर कडवी परीक्षा देण्यास मोठा कालावधी उलटला आहे. या महान खेळातील दिग्गजांना बीसीसीआय आणि सीएबी (कॅब) तर्फे सन्मानित करण्याचा प्रसंग शानदार होता, पण अन्य खेळाच्या चॅम्पियन्सचाही सन्मान होताना बघणे सुखावणारे होते. पहिल्या दिवशी जे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यात सौरव गांगुली व बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या कार्यकाळाची उत्साहवर्धक सुरुवात असल्याचे म्हटले जाऊ शकते.
मैदानावर भारतीय संघ चॅम्पियन्सप्रमाणे खेळला. दोन दिग्गज दिल्लीकर खेळाडूंसह सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने वर्चस्व गाजवले. ईशांत शर्मा अनेक वर्षांपासून लढवय्या सैनिकाप्रमाणे आहे. गेल्या तीन वर्षांत तो कमालीचा यशस्वी ठरत असल्याचे बघून आनंद झाला. दोन्ही डावात त्याचे चेंडू खेळणे अवघड होते. पहिल्या डावात सूर्यप्रकाशात, तर दुसऱ्या डावात त्याने प्रकाशझोतातमध्ये अचूक मारा केला. त्याने चेंडूचा टप्पा खोलवर राखत चेंडू अधिक स्विंग करण्यावर भर दिला. त्याने यष्टिपाठी तैनात असलेल्या क्षेत्ररक्षकांना सदैव खेळात कायम राखले.
परिस्थिती आव्हानात्मक होती आणि भारतीय वेगवान गोलंदाज आग ओकत होते, पण मुशफिकूर रहीमचा अपवाद वगळता बांगलादेशच्या अन्य फलंदाजांना आपल्या विकेटचे मोल ओळखता आले नाही. बांगलादेशचे फलंदाज मायदेशी परतल्यानंतर विराटच्या शानदार खेळीची क्लिप बघू शकतात. त्यात विराटने आणखी एक कसोटी शतक झळकावले. मी विराटच्या कामगिरीचा प्रशंसक आहे.
विराट कोहली ज्यावेळी कव्हर ड्राईव्ह खेळण्यासाठी आपला पाय पुढे काढतो ते बघणे शानदार असते. गुलाबी चेंडूबाबत सराव नसल्यामुळे विराटने कसोटी सामना प्रारंभ होण्यापूर्वी फलंदाजीवर अधिक मेहनत घेतली असावी. त्याने आपले शब्द खरे केले आणि चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणेची त्याला योग्य साथ लाभली. त्याचप्रमाणे मोहम्मद शमी व उमेश यादव यांनी ईशांत शर्माला साथ दिली.