Join us  

इशान किशनला शेवटची वॉर्निंग? राहुल द्रविड म्हणाले, संघात निवड व्हावी, असे वाटत असेल तर...

यष्टिरक्षक- फलंदाज केएस भरत याला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा इशान किशन ( Ishan Kishan) कुठे आहे हा प्रश्न विचारण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 4:34 PM

Open in App

भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर १०६ धावांनी विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली आहे. या सामन्यात यष्टिरक्षक- फलंदाज केएस भरत याला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा इशान किशन ( Ishan Kishan) कुठे आहे हा प्रश्न विचारण्यात आला. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) यांना पुन्हा एकदा इशान विषयीचा प्रश्न विचारला गेला. त्यावर द्रविड यांनी दिलेलं उत्तर पाहून सारेच चक्रावले आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर मानसिक थकवा असल्याचे सांगून इशानने विश्रांती मागितली आणि तेव्हापासून तो गायबच आहे.

मानसिक थकव्याचं कारण देऊन आफ्रिका दौऱ्यातून माघार घेणारा इशान दुबईत मित्रांसोबत पार्टी करताना दिसला होता. त्याच्या या कृतीवर बीसीसीआय व संघ व्यवस्थापन नाराज असल्याच्या बातम्या आल्या. आफ्रिका दौऱ्यानंतर घरच्या मैदानावर झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतही इशानची निवड झालेली नाही. तेव्हा त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला देण्यात आला होता, परंतु झारखंड संघाकडूनही तो खेळताना दिसला नाही. इशानला आपला फिटनेस व फॉर्म सिद्ध करण्यासाठी स्थानिक क्रिकेट खेळायला हवं, असे द्रविडने सांगितले होते.

मात्र, त्याच्या संघ व्यवस्थापनाच्या सल्ल्यानंतरही इशानने रणजी करंडक स्पर्धेकडे पाठ फिरवली आहे. तो झारखंड संघात दिसत नाही आणि त्याने झारखंड क्रिकेट संघटनेलाही काहीच कळवलेले नाही. इशानने झारखंडच्या सलग पाच सामन्यांत दांडी मारलेली आहे आणि यामुळे त्याच्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. इशानच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे, हेच कुणाला कळेनासे झाले आहे. त्यात आजच्या सामन्यानंतर द्रविड यांनी त्याला शेवटची वॉर्निंग दिली आहे. द्रविड म्हणाले, भारतीय संघात त्याची निवड व्हावी असे त्याला वाटत असेल, तर त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात करायला हवी. आम्ही त्याच्या संपर्कात आहोत.

 इशानने भारताकडून २ कसोटी सामने खेळले आहेत. २७ वन डे व ३२ ट्वेंटी-२० सामन्यांत त्याने राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी तो संघाचा प्रमुख यष्टिरक्षक-फलंदाज असू शकतो, परंतु सध्या त्याचा काहीच पत्ता नाही. 

टॅग्स :इशान किशनराहुल द्रविडबीसीसीआय