आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सनरायझर्स हैदराबादच्या संघाने एक अत्यंत धाडसी आणि अनपेक्षित निर्णय घेतला. संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी उपलब्ध नसल्याने, फ्रँचायझीने भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. तर, पॅट कमिन्स उपकर्णधार असेल.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू पॅट कमिन्स सध्या दुखापतीतून सावरत आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त होईपर्यंत मैदानात उतरू शकणार नाही. ऐनवेळी कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून संघ व्यवस्थापनाने इशान किशनवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जो पर्यंत कमिन्स दुखापतीतून सावरत नाही, तोपर्यंत इशान किशन संघाचे नेतृत्व करेल. तर, अभिषेक शर्माची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती हैदराबादच्या संघाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली.
नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात इशान किशनने मोलाची भूमिका बजावली आहे. आता त्याच्याकडे आयपीएलमध्ये स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्याची नामी संधी आहे. आयपीएलच्या मागच्या हंगामात इशान किशनने एकूण १४ सामन्यात १५२.५८ च्या स्टाइक रेटने ३५४ धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
इशान किशनचा आक्रमक अंदाज आणि यष्टीमागील चपळता संघासाठी फायदेशीर ठरू शकते. कर्णधारपदाच्या अतिरिक्त जबाबदारीमुळे त्याच्या वैयक्तिक खेळावर परिणाम होणार नाही, अशी आशा व्यवस्थापनाला आहे. पॅट कमिन्स मैदानात परतेपर्यंत इशान किशन हैदराबादची नौका कशी पार लावतो? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.