Ishan Kishan Break Silence Not Selected In Indian Cricket Team : टीम इंडियासह BCCI नं वार्षिक करारातून बाहेर काढलेल्या ईशान किशन याने फलंदाजीसह नेतृत्वातील कर्तृत्व दाखवून देत झारखंडच्या संघाला पहिली वहिली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून दिली. पुण्याच्या मैदानात रंगलेल्या फायनल सामन्यात झारखंडचा संघाने हरयाणाला पराभूत करत BCCI अंतर्गत घेण्यात येणारी देशांतर्गत टी-२० क्रिकेट स्पर्धा गाजवली. संघाच्या ऐतिहासिक विजयात कर्णधार ईशान किशन याने विक्रमी शतकासह सिंहाचा वाटा उचलला. बीसीसीआय निवडसमितीचा सदस्य प्रज्ञान ओझा अन् अन्य काही सदस्यही ही फायनल लढत पाहण्यासाठी मैदानात उपस्थितीत होते. ईशान किशन याने बीसीसीआय निवडकर्त्यांसमोर कडक खेळीसह पुन्हा एकदा टीम इंडियाचा दरवाजा ठोठावल्याची चर्चाही आता रंगू लागली आहे. प्रतिष्ठित देशांतर्गत स्पर्धा जिंकल्यावर ईशान किशन याने टीम इंडियातून स्थान गमावल्याचे दु:ख व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर... काय म्हणाला ईशान किशन
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेतील ऐतिहासिक कामगिरीनंतर ईशान किशन म्हणाला, "जेव्हा भारतीय संघात माझी निवड झाली नव्हती, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. कारण मी चांगली कामगिरी करत होतो. पण त्या वेळी मला जाणवलं की, जर अशा कामगिरीनंतरही निवड होत नसेल, तर मला अजून मेहनत घ्यावी लागेल. संघाला विजय मिळवून द्यावा लागेल आणि एक युनिट म्हणून उत्तम कामगिरी करावी लागेल. निराशा ही नेहमीच तुम्हाला मागे खेचते. पण या परिस्थितीत मेहनत करत राहायला हवे. स्वत:वर विश्वास ठेवायला हवा. आपण नेहमी चांगल्याची अपेक्षा करतो, पण जेव्हा टीम इंडियात नाव येत नाही त्यावेळी खूप वाईट वाटते. मी संघात का नाही? हा विचार करण्यापेक्षाय सातत्याने चांगली कामगिरी करत राहणं हेच माझ्या हातात आहे. ते करण्यावर भर देत आहे," असेही तो म्हणाला आहे.
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये दमदार शतक
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ च्या फायनलमध्ये ईशान किशनने ४९ चेंडूंत १०१ धावांची दमदार शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीत ६ चौकार आणि १० षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीच्या जोरावर झारखंडच्या संगाने २६२ धावा करत हरयणासमोर २६३ धावांचे आव्हान ठेवले होते. या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हरयाणाचा संघ १९३ धावांतच आटोपला. ईशान किशन याने सामनावीर पुरस्कार पटकवला.
यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा
भारतीय संघ आगामी आयसीसी टी-२० वर्ल्ड कपच्या तयारीत असताना ईशान किशन याने देशांतर्गत टी-२० स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करून दाखवली आहे. या स्पर्धेत त्याने २ अर्धशतकासह २ शतकांच्या मदतीने ५१७ धावा केल्या. यंदाच्या हंगामात ५०० धावांचा आकडा गाठणारा तो एकमेव फलंदाज आहे.
फार्म नव्हता तर हे होतं ईशान किशन संघाबाहेर होण्यामागचं कारण
ईशान किशन याने चांगली कामगिरी करूनही टीम इंडियात निवड न झाल्याची खंत व्यक्त केली असली तरी खराब कामगिरी ही तो संघाबाहेर जाण्यामागचं कारण नव्हते. २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी संघात निवड झाली असताना त्याने अचानक मालिकेतून माघार घेतली होती. मानसिक थकव्याचे कारण देत त्याने विश्रांती मागितली होती. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळत नसल्यामुळे त्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली. एवढेच नाही तर ब्रेकनंतर तो दुबईत जाऊन पार्टीत व्यग्र असल्याचेही काही फोटो व्हायरल झाले आणि तो संघातून बाहेर पडला.