Join us  

विश्वासाचा अभाव, कौशल्याचा अभाव! Irfan Pathan ची हार्दिक पांड्यावर बोचरी टीका     

हार्दिक पांड्याने २०वे षटक टाकण्याचा निर्णय घेतला आणि MS Dhoni ने शेवटच्या ४ चेंडूंत ६,६,६,२ अशी फटकेबाजी करून २० धावा चोपल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 4:32 PM

Open in App

मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याने पुन्हा एकदा चाहत्यांना टीका करण्याची संधी दिली. काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर यजमान मुंबई इंडियन्सला ऋतुराज गायकवाडच्या चेन्नई सुपर किंग्सने २० धावांनी पराभूत केले. MI चा हा सहा सामन्यांतील चौथा पराभव ठरला आहे आणि आता पुढचं गणित गडबडीचं झालं आहे. हार्दिक पांड्याने २०वे षटक टाकण्याचा निर्णय घेतला आणि MS Dhoni ने शेवटच्या ४ चेंडूंत ६,६,६,२ अशी फटकेबाजी करून २० धावा चोपल्या. याच २० धावा मुंबईच्या पराभवासाठी पुरेशा ठरल्या. यानंतर हार्दिकवर टीका होत आहे.

टुकार गोलंदाजी, टुकार कॅप्टन्सी! Sunil Gavaskar यांनी हार्दिक पांड्याला बेक्कार धुतले

भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाण ( Irfan Pathan ) याने तर हार्दिकवर जोरदार टीका केली आहे.  एमआयने हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिल्यानंतर नाराज झालेल्या चाहत्यांकडून त्याच्यावर टीका होताना दिसतेय. आता तर त्याने चाहत्यांना आणखी संधी दिली आहे. इरफानने हार्दिकवर उघडपणे टीका केली होती, ज्याने गुजरात टायटन्सचा माजी कर्णधाराला MI ची जबाबदारी देण्याच्या निर्णयावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

कालच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या फटकेबाजीमुळे हार्दिकच्या त्या षटकात २६ धावा आल्या. हार्दिकने ते षटक आकाश मढवाल याला द्यायला हवे होते, असे इरफानला वाटते. ''श्रेयस गोपाळने त्याच्या पहिल्या षटकात डावखुऱ्या फलंदाजाला बाद केले. पण, त्यानंतर त्याला पुढील षटक दिले गेले नाही, तेही समोर डावखुरा फलंदाज असताना. हार्दिक पांड्या तेव्हा आला आणि १५ धावा दिल्या. हार्दिक पुन्हा २०व्या षटकात गोलंदाजीला आला, तिथे त्याने २६ धावा दिल्या. आकाश मढवाल हा पर्याय होता, जरी त्याने मागच्या वर्षाप्रमाणे यंदा चांगली कामगिरी केली नसली तरी. त्याला षटक दिले गेले असते तर इतक्या धावा CSK ला कदाचित नसत्या करता आल्या. MS Dhoni ने २० धावा चोपल्या, त्याच निर्णायक ठरल्या. या मैदानावर धावांचा बचाव करणे सोपं नाही, परंतु मथिशा पथिराणाने अप्रतिम स्पेल टाकली. आजच्या स्पेलने त्याने जसप्रीत बुमराह यालाही मागे टाकले,''असे इरफान पठाण म्हणाला. 

हार्दिकमध्ये कौशल्याचा अभाव आहेच, शिवाय त्याचा आपल्या गोलंदाजावर विश्वास नसल्याची टीकाही इरफानने केली. 

टॅग्स :आयपीएल २०२४हार्दिक पांड्याइरफान पठाणमुंबई इंडियन्सचेन्नई सुपर किंग्स