अबुधाबी : आयर्लंड संघाने सहा वर्षांत सात कसोटी सामने गमविल्यानंतर शुक्रवारी पहिलावहिला कसोटी विजय नोंदवीत मार्चचा पहिला दिवस संस्मरणीय ठरविला. अफगाणिस्तानविरुद्ध येथे खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटीच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी सहा गडी राखून विजय नोंदविला. सामन्यात आठ गडी बाद करणारा २७ वर्षांचा वेगवान गोलंदाज मार्क ॲडेअर सामन्याचा मानकरी ठरला.
कर्णधार अँड्र्यू बालबर्नीने लक्ष्याचा पाठलाग करीत विजयात मोलाची भूमिका बजावली. याआधी आयर्लंड संघ ७ कसोटी सामने खेळला. सर्व सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने ५४.५ षटकांत इब्राहिम जादरानच्या अर्धशतकाच्या जोरावर १५५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आयर्लंडने ८३.४ षटकांत पॉल स्टर्लिंगच्या ५२ धावांमुळे २६३ धावा उभारल्या. अफगाणिस्तानने दुसऱ्या डावात ७५.४ षटकांत २१८ धावा उभारल्यामुळे आयर्लंडला विजयासाठी १११ धावांचे लक्ष्य मिळाले होते. हे लक्ष्य त्यांनी ३१.३ षटकांत ४ गडी गमावून गाठले आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.
एकवेळ १३ धावांत तीन फलंदाज गमाविल्यानंतरही कर्णधार अँड्र्यू बालबिर्नीने धावसंख्येला आकार दिला. त्याने पॉल स्टर्लिंगसोबत चौथ्या गड्यासाठी २६ आणि लॉर्कन टकरसोबत पाचव्या गड्यासाठी ७२ धावांची भागीदारी केली. बालबिर्नीने ९६ चेंडूंत नाबाद ५८ धावा ठोकल्या. आयर्लंड संघाचा डब्ल्यूटीसीत समावेश नाही. त्यामुळे या संघाला एका कसोटी सामन्याची मालिका खेळावी लागते. श्रीलंकेविरुद्ध त्यांना दोन सामन्यांची एकमेव कसोटी मालिका खेळता आली.
संक्षिप्त धावफलक
आयर्लंड २६३ (स्टर्लिंग ५२, झिया उर रहमान ५-६४ ) आणि ४ बाद १११ ( अँड्र्यू बालबर्नी नाबाद ५८, टकर नाबाद २७, नाविद २-३१) मात अफगाणिस्तान १५५ (इब्राहिम जादरान ५३, मार्क ॲडेअर ५-३९) आणि २१८ (शाहिदी ५५, यंग ३-२४, मॅकार्थी ३-४८, मार्क ॲडेअर ३-५६) . निकाल : आयर्लंड ६ गड्यांनी विजयी.