Join us  

आयर्लंडने दिला दक्षिण आफ्रिकेला धक्का; दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मारली बाजी

पावसामुळे पहिला सामना झाला होता रद्द. तीन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडची बाजी.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 9:58 AM

Open in App
ठळक मुद्देपावसामुळे पहिला सामना झाला होता रद्द. तीन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडची बाजी.

डबलिन : कर्णधार अँडी बलबिर्नी याच्या शानदार शतकाच्या जोरावर आव्हानात्मक मजल मारलेल्या आयर्लंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपल्याहून अधिक बलाढ्य असलेल्या दक्षिण आफ्रिकेला ४३ धावांनी नमवण्याचा पराक्रम केला.

विशेष म्हणजे, पावसामुळे पहिला सामना रद्द झाल्याने यासह तीन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडने १-० अशी आघाडी घेतली आहे. आता मालिका बरोबरीत आणून पराभव टाळण्यासाठी आफ्रिकेला शुक्रवारचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. बलबिर्नीने ११७ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह १०२ धावांची खेळी करीत आयर्लंडला ५० षटकांत ५ बाद २९० धावांची मजल मारून दिली. हॅरी टेक्टर यानेही ६८ चेंडूंत ७९ धावा करीत आयर्लंडच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना विशेष छाप पाडता आली नाही. सर्वांत यशस्वी ठरलेल्या अँडिले फेहलूकवायो याने ७३ धावांत २ बळी घेतले.

यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यास उतरलेल्या द. आफ्रिकेला ४८.७ षटकांत केवळ २४७ धावांत गुंडाळून आयर्लंडने धक्कादायक विजय मिळविला. मार्क एडेर, जोश लिटल व अँडी मॅकब्राइन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. सलामीवीर जेनेमन मलान (८४) व रेस्सी वॅन डेर डुसेन (४९) यांनी दिलेली झुंज अपयशी ठरली. आयर्लंडने द. आफ्रिकेला पहिल्यांदाच नमवण्याचा पराक्रम केला.

संक्षिप्त धावफलक आयर्लंड : ५० षटकांत ५ बाद २९० धावा (अँडी बलबिर्नी १०२, हॅरी टेक्टर ७९; अँडिले फेहलुकवायो २/७३.) वि. वि. दक्षिण आफ्रिका : ४८.३ षटकांत सर्वबाद २४७ धावा (जेनेमन मलान ८४, रेस्सी वॅन डेर डुसान ४९; अँडी मॅकब्राइन २/३४, मार्क एडेर २/४३, जोश लिटल २/४५.)

टॅग्स :आयर्लंडद. आफ्रिकापाऊस