आयपीएल 2025 च्या चौथ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जाएंट्सवर मात करत, थरारक विजय मिळवला. खरे तर 210 धावांचा पाठलाग करताना दिल्लीची 113 धावांवर 6 विकेट अशी अवस्था झाली होती. मात्र नंतर, विपराज निगम आणि आशुतोष शर्माने सामन्याची दिशाच बदलली. आशुतोषने षटकार ठोकत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
३१ चेंडू ५ चौकार, ५ षटकार अन् नाबाद ६६ धावा - संघ संकटात सापडला असताना विपराज निगम याने १५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने २६० च्या स्ट्राइक रेटनं ३९ धावा कुटत सामन्यात ट्विस्ट आणला. त्याची विकेट पडल्यावर आशुतोष शर्मानं सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने ३१ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारासह नाबाद ६६ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
दिल्लीनं 3.80 कोटीत केलंय खरेदी -आशुतोषने पंजाब किंग्सकडून आयपीएलमध्ये डेब्यू केले होते. प्रीती झिंटाच्या या संघाने त्याला 20 लाख रुपयांना खरेदी केले होते. तेव्हा त्याने 11 सामन्यांत 189 धावा केल्या होत्या. खरे तर त्याला संधीही कमीच मिळाली होती. यानंतर, आशुतोषच्या फलंदाजीने प्रभावित होऊन दिल्ली कॅपिटल्सने त्याला 3.80 कोटी रुपयांना खरेदी केले आणि त्यानेही पहिल्याच सामन्यात स्वतःला सिद्ध केले.
पराभव दिसत होता अटळ, पण आशुतोषने असा खेचून आणला विजय, शेवटच्या ३ षटकांत काय घडलं?
कोण आहे आशुतोष शर्मा? -26 वर्षीय आशुतोषचा जन्म मध्य प्रदेशातील रतलामचा. त्याने वयाच्या 8 व्या वर्षीच घर सोडले होते आणि तो क्रिकेटर बनण्यासाठी इंदौरला आला होता. 10 वर्षांचा असल्यापासूनच तो छोटी-मोठी कामे करत आपली दिनचर्या चालवत होता. या काळात त्याला लोकांचे कपडेही धुवावे लागले. त्याने अंपायरिंगही केली. मात्र माजी क्रिकेटर अमय खुरसियाने त्याचे जीवनच बदलले.
रेल्वेमध्ये संधी - माजी क्रिकेटर अमय खुरासिया यांनी आशुतोषचे जीवनच बदलले. आशुतोषला हळूहळू मध्य प्रदेश संघात स्थान मिळाले. मात्र काही कारणास्तव, त्याला हा संघ सोडून रेल्वेमध्ये जॉइन व्हावे लागले. तेथे त्याला खेळण्याची चांगली संधी मिळाली. १७ ऑक्टोबर २०२३ रोजी आशुतोषने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने केवळ ११ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. त्याने अरुणाचल प्रदेशविरुद्ध जबरदस्त फलंदाजी केली होती. यानंतर त्याला पंजाब किंग्जमध्ये संधी मिळाली. यानंतर त्याने कधीही मागे वळून बघितले नाही.