Join us

IPL 2024: केएल राहुलच्या लखनौला मोठा झटका; ६.४ कोटींचा खेळाडू IPL मधून बाहेर!

Shivam Mavi ruled out of TATA IPL 2024: लखनौ सुपर जायंट्सचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२४ मधून बाहेर झाला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 14:07 IST

Open in App

सध्या आयपीएल २०२४ चा हंगाम सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध विजय मिळवल्यानंतर लखनौ सुपर जायंट्सच्या संघाला मोठा झटका बसला आहे. लखनौच्या संघाचा वेगवान गोलंदाज शिवम मावी दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर झाला आहे. खरं तर दुखापतीमुळे तो यंदाच्या हंगामातील एकही सामना खेळू शकला नाही. लखनौने त्याला मिनी लिलावात ६.४ कोटी रूपयांना खरेदी केले होते. (Shivam Mavi Ruled Out)

लखनौचा वेगवान गोलंदाज शिवम मावी दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. याच वर्षी तो लोकेश राहुलच्या संघाचा भाग झाला होता. पण, दुखापतीमुळे त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. लखनौच्या फ्रँचायझीने शेअर केलेल्या व्हिडीओत मावी कॅम्पमधून बाहेर पडताना दिसत आहे.

शिवम मावी स्पर्धेबाहेर दरम्यान, शिवम मागील मोठ्या कालावधीपासून दुखापतीने त्रस्त होता. याआधी तो आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ ला मुकला. तेव्हा तो पाठीच्या दुखापतीमुळे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करू शकला नाही. या दुखापतीतून सावरल्यानंतर तो आयपीएलसाठी परतला होता, मात्र तो पुन्हा एकदा दुखापतीच्या कचाट्यात सापडल्याने लखनौच्या संघाची डोकेदुखी वाढली. मावी ऑगस्ट २०२३ पासून क्रिकेटपासून दूर आहे. भारतीय गोलंदाजाने आयपीएमध्ये आतापर्यंत ३२ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ३० बळी घेतले. लखनौच्या संघाचा भाग होण्यापूर्वी शिवम मावी कोलकाता नाईट रायडर्सच्या फ्रँचायझीचा हिस्सा होता.  

लखनौने आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पंधराव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नमवून विजय साकारला. प्रथम फलंदाजी करताना लोकेश राहुलच्या संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १८१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीचा संघ संपूर्ण २० षटके देखील खेळू शकला नाही. आरसीबी १९.४ षटकांत केवळ १५३ धावा करू शकली आणि २८ धावांनी सामना गमावला.

टॅग्स :लखनौ सुपर जायंट्सआयपीएल २०२४लोकेश राहुल