The Hundred 2024: इंडियन प्रीमिअर लीगमधील (IPL) फ्रँचायझी जगातील अन्य ट्वेंटी-२० लीगमध्ये देखील गुंतवणूकीचा सपाटा लावताना दिसत आहेत. मुंबई इंडियन्स, लखनौ सुपर जायंट्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थनन रॉयल्स या फ्रँचायझी इंग्लंडमध्ये होणाऱ्या दी हंड्रेड (The Hundred) लीगमध्ये गुंतवणूक करणार असल्याचे कळते. आयपीएल फ्रँचायझींसह ललित मोदी आणि एन श्रीनिवास हे देखील या लीगमध्ये पैसे गुंतवणार आहेत.
जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएलची ज्यांनी सुरुवात केली, परंतु आर्थिक हेराफेरीमुळे ज्यांच्यावर खटला सुरू आहे ते ललित मोदी या लीगमध्ये गुंतवणूक करणार आहेत, अशी माहिती वृत्तसंस्था 'द मिरर'ने दिली. त्यामुळे या लीगला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्ड खासगीकरणाच्या मार्गावर असताना दी हंड्रेड लीगमध्ये एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ट्वेंटी-२० लीगची वाढती लोकप्रियता पाहता आयपीएल फ्रँचायझी अन्य ट्वेंटी-२० लीगमध्ये पैसे गुंतवून नफा कमावण्याच्या प्रयत्नात आहेत.
खासगीकरणाची व्याप्ती, महसूल वाटणीचे मॉडेल आणि रिअल इस्टेटचा विचार हे चर्चेचे प्रमुख मुद्दे आहेत. भारतीय गुंतवणूकदार वर्चस्व गाजवू शकतात की स्थानिक भागीदारींना प्राधान्य दिले जाईल? हा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरीत आहे. ललित मोदी आणि एन श्रीनिवासन या दोघांनाही इंग्लिश क्रिकेटमध्ये रस आहे. लीगमध्ये मोदींचा मागील काळातील सहभाग आणि अलीकडील संभाव्य अब्ज डॉलर्सच्या ऑफरने क्रिकेट विश्वाच्या भुवया उंचावल्या. श्रीनिवासन हे आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या फ्रँचायझीचे मालक आहेत.