Join us

आयपीएल रिटेनशन : खेळाडू आणि फ्रॅन्चायजी रणनीतीत व्यस्त, श्रेयस अय्यरला हवे कर्णधारपद, दिल्ली सोडणार!

रिटेनशन धोरणामागील कारण आयपीएलमध्ये यंदा नव्याने जुळलेले दोन नवे संघ लखनौ आणि अहमदाबाद हे आहेत. यामुळे शिल्लक राहणाऱ्या खेळाडूंमधून प्रत्येकी चार खेळाडूंची निवड करणे नव्या संघांना सोपे जाईल.  आयपीएलचे वैशिष्ट्य असे की, सर्वच संघांमध्ये तुल्यबळ, अनुभवी आणि प्रतिभावान खेळाडूंचा भरणा असतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 09:32 IST

Open in App

अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर -

इंडियन प्रीमियर लीग-२०२२ (आयपीएल)च्या सत्रासाठी संघ बांधणी प्रक्रिया सुरू झाली. सध्याचा चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्जने कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड यांना रिटेन (संघात कायम)केले. आगामी काही दिवसात अन्य फ्रॅन्चायजींचे वृत्त देखील येणार आहे.  ३० नोव्हेंबरपूर्वी सर्व आठही संघांना  रिटेन करण्यात येणाऱ्या चार (एक विदेशी) खेळाडूंची यादी सादर करायची आहे. उदा. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीशिवाय देवदत्त पडिक्कल, ग्लेन मॅक्सवेल, केकेआरचा शुभमन गिल आणि वरुण चक्रवर्ती, राजस्थान रॉयल्सचा संजू सॅमसन, बेन स्टोक्स आणि जोस बटलर हे रिटेन होऊ शकतील. रिटेनशन धोरणामागील कारण आयपीएलमध्ये यंदा नव्याने जुळलेले दोन नवे संघ लखनौ आणि अहमदाबाद हे आहेत. यामुळे शिल्लक राहणाऱ्या खेळाडूंमधून प्रत्येकी चार खेळाडूंची निवड करणे नव्या संघांना सोपे जाईल.  आयपीएलचे वैशिष्ट्य असे की, सर्वच संघांमध्ये तुल्यबळ, अनुभवी आणि प्रतिभावान खेळाडूंचा भरणा असतो. तथापि, आतापर्यंत मुंबई संघ सर्वाधिक वेळा चॅम्पियन बनला. अन्य संघांमध्येही चॅम्पियन बनण्याची क्षमता आहे. सर्व संघ तुल्यबळ असतील तरच प्रत्येक सामन्यात रोमांचकता अनुभवायला मिळेल. याच धोरणांतर्गत फ्रॅन्चायजी खेळाडूंना रिटेन करतील तर खेळाडूदेखील भावी काळ लक्षात घेऊन योजना आखण्यात व्यस्त आहेत.लोकेश राहुल आणि शेयस अय्यर यांनी आपापल्या जुन्या संघांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. पंजाब किंग्सचा कर्णधार राहुल लखनौकडून खेळण्याची शक्यता असून, त्याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपविले जाईल. दुसरीकडे अय्यरदेखील नेतृत्वाची आस लावून बसला. दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंत याला कर्णधार बनविण्याचा निर्णय घेतला. फ्रॅन्चायजी आपल्या एखाद्या खेळाडूला रिटेन करणार नसेल तरी डिसेंबरमध्ये होणाऱ्या लिलावाच्यावेळी त्या खेळाडूला स्वत:कडे घेऊ शकेल. उदा. मुंबई इंडियन्सने किरोन पोलार्डला सध्या रिटेन केले नाही तर डिसेंबरमधील लिलावात बोली लावून त्याला स्वत:कडे घेऊ शकेल.एकूणच आयपीएल खेळाडूंना शानदार कामगिरीसोबतच स्वत:ची ब्रॅन्ड व्हॅल्यू वाढविण्याची संधी असते.  दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने आंतरराष्ट्रीय स्तरावर शानदार कामगिरीच्या बळावर स्वत:ची ब्रॅन्डव्हॅल्यू वाढविली आहे. टी-२० त राष्ट्रीय संघाचा कर्णधार बनल्यापासून रोहित शर्माच्या ब्रॅन्ड व्हॅल्यूमध्ये उल्लेखनीय वाढ झाली. खरेतर आयपीएल हे क्रिकेटसह व्यवसायाचे मोठे व्यासपीठ बनले आहे. 

टॅग्स :अयाझ मेमनआयपीएल २०२१दिल्ली कॅपिटल्स
Open in App