नवी दिल्ली :  इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल २०२२) मेगा ऑक्शन लखनौ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघांच्या समावेशासह होणार आहे. बीसीसीसीआय दोन्ही संघांना  लिलावात उत्तम संघ तयार करण्याची संधी देईल. जुन्या आठ फ्रेंचायझींनी काही खेळाडूंना कायम ठेवले. त्यांना जास्तीत जास्त चार खेळाडू कायम ठेवण्याची (रिटेन) परवानगी होती. बीसीसीआयने अद्याप मेगा लिलावाची तारीख जाहीर केली नसली, तरी आयपीएल सूत्रानुसार लिलाव फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो.
बीसीसीआय सध्या सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्सच्या स्वीकृत स्थितीवर चर्चा करीत आहे. या कंपनीने अहमदाबाद फ्रेंचायझी विकत घेतल्यानंतर वाद निर्माण झाला. सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबाद फ्रेंचायझीसाठी अदानी समूहाला मागे टाकण्यासाठी ५,६०० कोटी रुपयांची दुसरी सर्वोच्च बोली लावली. परंतु सट्टेबाजी कंपन्यांशी सीव्हीसीच्या कथित संबंधांमुळे बीसीसीआयवर बरीच टीकाही झाली. 
आयपीएल २०२२ मेगा लिलाव आयोजित करण्याची तयारी बंगळुरू आणि हैदराबाद  यांनी दाखविली आहे.   क्रिकेट डॉट कॉमच्या वृत्तानुसार,‘हा लिलाव फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. बंगळुरू आणि हैदराबाद ही दोन शहरे आयपीएल लिलावासाठी आघाडीवर आहेत.’ दरम्यान, लखनौ आणि अहमदाबादसाठी १ डिसेंबरपासून ‘रिटेन्शन विंडो’ सुरू झाली आहे. लिलावापूर्वी प्रत्येकी ३३ कोटी रुपये खर्च करून दोन्ही संघ प्रत्येकी ३ खेळाडूंना  घेऊ शकतील.. या खेळाडूंसाठी अनुक्रमे १५ कोटी, ११ कोटी आणि ७ कोटींचे शुल्क आकारू शकतात. तसेच, तीन खेळाडूंपैकी दोन भारतीय असणे आवश्यक आहे.