इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ च्या मेगा लिलावात अनेक खेळाडूंवर मोठी बोली लागल्याचे पाहायला मिळाले. सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात पार पडलेल्या मेगा लिलावात भारतीय खेळाडूंना चांगला भाव मिळाला. काही मोजक्या परदेशी खेळाडूंनाच मोठे पॅकेज मिळालं. त्यात एक नाव म्हणजे लियाम लिविंगस्टोन.
RCB नं मोठी बोली लावली अन् त्याने बाहुबली शो दाखवला
आयपीएल मेगा लिलावात पहिल्या दिवशी कंजूष ठरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने दुसऱ्या दिवशी तगडी शॉपिंग केली. यात इंग्लंडचा ऑल राउंडर लियाम लिविंगस्टोनवर RCB संघानं ८ कोटी ७५ लाखांची बोली लावली. मोठी बोली लागल्यावर या पठ्यानं त्याच दिवशी बाहुबली शो दाखवून दिला. आपल्यावर लावलेला पैसा वाया जाणार नाही, याची हमी या क्रिकेटपटून अबुधाबी टी-१० लीगच्या सामन्यातून दिली आहे.
टी १० लीगमध्ये संघ अडचणीत असताना उतरला होता मैदानात
लियाम लिविंगस्टोन सध्या अबुधाबी टी १० लीगमध्ये बांग्ला टायगर्स संघाचा भाग आहे. ज्या दिवशी त्याच्यावर मोठी बोली लागली त्याच दिवशी त्याच्या भात्यातून धमाकेदार खेळी आल्याचा कमालीचा योगायोग पाहायला मिळाला. दिल्ली बुल्सच्या संघाने १० षटकात १२३ धावा करत बांग्ला टायगर्स संघासमोर १२४ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना बांग्ला संघानं ४० चेंडूत विजय नोंदवला. बांग्ला संघाने ६.४ षटकात ६५ धावांत दोन विकेट्स गमावल्यावर लियाम लिविंगस्टोन मैदानात उतरला होता.
१५ चेंडूत नाबाद ५० धावा करत जिंकून दिला सामना
तो आला अन् मग सारे फक्त त्याच्या भात्यातून निघणारी फटकेबाजी फक्त बघतच राहिले. या पठ्यानं १५ चेंडूत नाबाद ५० धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तुफानी खेळीत त्याने ३ चौकार आणि ५ षटकार मारले. त्याची ही खेळी RCB नं त्याच्यावर खेळलेला डाव एकदम परफेक्ट आहे, हेच दाखवणारी होती.