Join us  

IPL 2024 SRH vs MI: "रोहित माझ्यासाठी वडिलांसारखा...", हिटमॅनला मुंबईच्या खेळाडूंकडून शुभेच्छा

IPL 2024 SRH vs MI Live: रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी २०० वा सामना खेळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 7:25 PM

Open in App

IPL 2024 SRH vs MI Live Updates In Marathi | हैदराबाद: आज सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होत आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्हीही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला. यजमान संघात ट्रॅव्हिस हेड आणि जयदेव उनाडकट यांची एन्ट्री झाली आहे. तर मुंबईच्या संघात ल्यूक वुडच्या जागी Kwena Maphaka ला संधी मिळाली आहे

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा आज या फ्रँचायझीसाठी २०० वा सामना खेळत आहे.  या ऐतिहासिक सामन्यापूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने रोहितला खास जर्सी भेट दिली, ज्यावर २०० असा उल्लेख आहे. रोहितच्या २०० व्या सामन्याच्या निमित्ताने मुंबईच्या शिलेदारांनी खास प्रतिक्रिया देत हिटमॅनला शुभेच्छा दिल्या. मुंबई इंडियन्सने याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. (IPL 2024 News) 

रोहितला सहकाऱ्यांकडून शुभेच्छा 

  • सचिन तेंडुलकर - रोहित शर्मा अप्रतिम खेळाडू आहे. त्याला मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीसोबत घेण्यासाठी मी मोठ्या कालावधीपूर्वी नीता अंबानी यांच्याशी चर्चा केली होती आणि रोहितला आपल्या संघात घ्यायलाच हवे असे सांगितले होते.
  • हार्दिक पांड्या - रोहित हा मुंबईच्या संघाचा पाया आहे, त्याने या फ्रँचायझीला खूप काही दिले आहे. रोहितला त्याच्या द्विशतकांसाठी ओळखले जाते. पण मला आशा आहे की, हे देखील त्याच्यासाठी खूप खास असेल. 
  • इशान किशन - रोहित शर्मामध्ये असलेले नेतृत्व कौशल्य खूप चांगले असून त्याच्याकडून खूप काही शिकता आले. 
  • तिलक वर्मा - रोहित शर्मा माझ्यासाठी वडिलांसारखा आहे. 

दरम्यान, आज सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (SRH vs MI) यांच्यात सामना होत आहे. हा सामना मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मासाठी खास आहे. कारण रोहित मुंबईसाठी २०० वा सामना खेळत आहे. २०११ मध्ये तो मुंबईच्या फ्रँचायझीसोबत जोडला गेला. मागील १४ वर्षात हिटमॅनने मुंबई इंडियन्ससाठी आतापर्यंत १९९ सामना खेळले असून ५०८४ धावा केल्या आहेत. २०१३ मध्ये रिकी पॉन्टिगनंतर रोहित शर्माने मुंबईचे कर्णधारपद सांभाळले. तेव्हापासून तो २०२३ पर्यंत मुंबईचा कर्णधार राहिला. रोहितने कर्णधारपदाच्या पदार्पणाच्या हंगामातच पहिले जेतेपद पटकावले. मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये आयपीएल जिंकली आहे. त्यामुळे हैदराबादविरूद्धचा सामना रोहितसाठी ऐतिहासिक आहे. 

आजच्या सामन्यासाठी मुंबईचा संघ -हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित  शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नमन धीर, गेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, शम्स मुलाणी, क्वेना महाका.

आजच्या सामन्यासाठी हैदराबादचा संघ -पॅट कमिन्स (कर्णधार), मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड,  भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडेय आणि जयदेव उनाडकट. 

टॅग्स :रोहित शर्मामुंबई इंडियन्सहार्दिक पांड्याआयपीएल २०२४सचिन तेंडुलकर