Join us  

IPL 2024 RCB vs KKR: 'विराट' खेळी अन् यजमान सुस्साट! गंभीरनं जिंकलं मन, स्टार्कची बेक्कार धुलाई

IPL 2024 RCB vs KKR Live Score Card: विराट कोहलीने अप्रतिम खेळी करत केकेआरसमोर सन्मानजनक धावसंख्या उभारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 8:54 PM

Open in App

IPL 2024 RCB vs KKR Live Updates In Marathi | बंगळुरू: विराट कोहलीने विराट खेळी करत डाव सावरला आणि केकेआरसमोर सन्मानजनक धावसंख्या उभारली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना किंग कोहलीने अप्रतिम कामगिरी केली. आयपीएलच्या सतराव्या हंगामातील दहावा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होत आहे. २०१६ पासून आरसीबीला एकदाही या मैदानावर केकेआरचा पराभव करता आला नाही. आरसीबीने निर्धारित २० षटकांत ६ बाद १८२ धावा करून केकेआरला विजयासाठी १८३ धावांचे आव्हान दिले. किंग कोहलीने ८३ धावांची नाबाद खेळी केली. केकेआरच्या संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर विराटच्या खेळीचे कौतुक करताना दिसला. 

प्रथम फलंदाजी करताना यजमान आरसीबीला कर्णधार फाफ डुप्लेसिसच्या रूपात मोठा झटका बसला. त्यानंतर कॅमरून ग्रीन आणि ग्लेन मॅक्सवेलने विराटला चांगली साथ दिली. अखेरच्या काही षटकांमध्ये दिनेश कार्तिकने फिनिशिंग टच देत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. 

आरसीबीकडून विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या, त्याने ५९ चेंडूत ४ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ८३ धावा केल्या. तर, फाफ डुप्लेसिस (६), कॅमरून ग्रीन (३३), ग्लेन मॅक्सवेल (२८), रजत पाटीदार (३), अनुज रावत (३) आणि दिनेश कार्तिकने नाबाद २० धावा केल्या. 

केकेआरकडून आंद्रे रसेल वगळता सर्वच गोलंदाजांची धुलाई झाली. रसेल आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले, तर सुनील नरेनला १ बळी घेण्यात यश आले. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा गोलंदाज ठरलेल्या मिचेल स्टार्कची आज देखील बेक्कार धुलाई झाली. स्टार्कला आज देखील एकही बळी घेता आला नाही आणि त्याने ४ षटकांत ४७ धावा दिल्या. 

KKR चा संघ 

श्रेयस अय्यर (कर्णधार), फिल साल्ट (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, रमनदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा आणि वरूण चक्रवर्ती, अनुकूल राय. 

RCB चा संघ - 

फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अनुज रावत, यश दयाल, अल्झारी जोसेफ, मयंत डागर आणि मोहम्मद सिराज.  

टॅग्स :विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्सगौतम गंभीर