Join us  

IPL 2024 GT vs MI: 'हार्दिक' अभिनंदन पण गुजरातचे! मुंबईच्या तोंडचा घास पळवला

IPL 2024 GT vs MI Live Score Card: नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना पार पडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 11:24 PM

Open in App

IPL 2024 GT vs MI Live Updates In Marathi | अहमदाबाद: गुजरात टायटन्सनेमुंबई इंडियन्सचा ६ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स (GT vs MI) यांच्यातील लढत नाना कारणांनी महत्त्वाची ठरली. दोन्हीही संघ नवीन कर्णधारांच्या नेतृत्वात होते. गुजरात टायटन्सचा माजी कर्णधार हार्दिक पांड्या मुंबईचा विद्यमान कर्णधार आहे, तर शुबमन गिल प्रथमच कर्णधापद सांभाळत आहे. (IPL live News) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. यजमान गुजरातने (IPL live cricket score) प्रथम फलंदाजी करताना साजेशी कामगिरी करून १६९ धावांचे आव्हान दिले होते. (IPL 2024 Live) 

१६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला इशान किशनच्या रूपात सुरुवातीलाच मोठा झटका बसला. नंतर नमनने मुंबईचा मोर्चा सांभाळत काहीसा धीर दिला. रोहित शर्माने आपल्या अनुभवाचा फायदा घेत सावध खेळी केली आणि डाव सावरला. मात्र, ही जोडी तंबूत परतल्यानंतर यजमानांनी पुनरागमन केले. पण डेव्हाल्ड ब्रेव्हिस मैदानात आला आणि त्याने 'इम्पॅक्ट' पाडला. तो बाद झाल्यानंतर सामन्यात रंगत आली. 

मुंबईला अखेरच्या १२ चेंडूत विजयासाठी २७ धावांची आवश्यकता होती. एकोणिसाव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर तिलक वर्माने षटकार ठोकला पण त्याच्या पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. आता १० चेंडूत २१ धावांची आवश्यकता होती. मग पुढच्या दोन चेंडूवर १-१ धाव काढण्यात मुंबईला यश आले. १९ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर गेराल्ड कोएत्झीला बाद करून यजमानांनी सामना आपल्या बाजूला फिरवला.

अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी १९ धावांची गरज होती. स्ट्राईकवर कर्णधार हार्दिक पांड्या होता. पहिल्याच चेंडूवर पांड्याने षटकार आणि त्याच्या पुढच्या चेंडूवर चौकार ठोकला आणि सामन्यात रंगत आणली. आता ४ चेंडूत ९ धावांची गरज होती. पण चौथ्या चेंडूवर हार्दिक बाद झाला अन् पुन्हा गुजरातने पुनरागमन केले. मुंबईचा कर्णधार ४ चेंडूत ११ धावा करून तंबूत परतला. ३ चेंडूत ९ धावा हव्या असताना पियुष चावला बाद झाला. अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने एक धाव काढली आणि शेवटच्या चेंडूवर देखील एक धाव मिळाली. अशाप्रकारे मुंबईने ६ धावांनी सामना गमावला. 

मुंबईकडून इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या डेव्हाल्ड ब्रेव्हिसने सर्वाधिक (४६) धावा केल्या, तर रोहित शर्मा (४३), नमन धीर (२०), तिलक वर्मा (२५), टीम डेव्हिड (११) आणि हार्दिक पांड्याने (११) धावा केल्या. मुंबईचा संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद १६२ धावा करू शकला आणि सामना ६ धावांनी गमावला. गुजरातच्या गोलंदाजांनी सांघिक कामगिरी केली. अजमतुल्लाह उमरजई, उमेश यादव, मोहित शर्मा आणि स्पेसर जॉन्सन यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले, तर साई किशोरने एक बळी घेतला. 

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक (४५) धावा केल्या, पण त्याला देखील बुमराहने आपल्या जाळ्यात फसवले. कर्णधार शुबमन गिल (३१), वृद्धीमान साहा (१९), अजमतुल्लाह उमरजई (१७), डेव्हिड मिलर (१२), राहुल तेवतियाने (२२) धावा केल्या. यजमान संघाने निर्धारित २० षटकांत ६ बाद १६८ धावा केल्या होत्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर गेराल्ड कोएत्झी (२) आणि पियुष चावलाला (१) बळी घेण्यात यश आले.  मुंबईचा संघ -हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन, नमन धीर, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, शम्स मुलाणी, गेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह आणि ल्यूक वुड.

गुजरातचा संघ -शुबमन गिल (कर्णधार), वृद्धीमान साहा, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अजमतुल्लाह उमरजई, राशिद खान, उमेश यादव, साई किशोर आणि स्पेंसर जॉन्सन. 

टॅग्स :मुंबई इंडियन्सगुजरात टायटन्सआयपीएल २०२४हार्दिक पांड्यारोहित शर्मा