Join us

IPL: अवघ्या ३ महिन्यात आयुष्य बदललं; कारचा हप्ता न भरू शकणारे पांड्या बंधू बनले कोट्यधीश

ज्यांचे आयुष्य कधीकाळी रटाळ होते. दोन वेळचे अन्न मिळविण्याचा संघर्ष चालायचा. परिस्थितीशी झुंज देत हे खेळाडू फ्रेंचाईजींचा भाग बनले. त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 05:32 IST

Open in App

मतीन खान, स्पोर्ट्‌स हेड सहायक उपाध्यक्ष, लोकमत पत्रसमूह 

आयपीएल म्हणजे पैशाचा सागर. या महासागरात उडी मारण्याचा अर्थ कोट्यवधी रुपये घेऊन बाहेर पडणे, असा आहे. मात्र, इथपर्यंतची वाटचालही तितकीच कठीण. प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीचे सूक्ष्म मूल्यांकन केल्यानंतर, फ्रेंचाईजी आपल्या तंबूत त्याला स्थान देते. येथे आम्ही अशा काही खेळाडूंचा उल्लेख करणार आहोत, ज्यांचे आयुष्य कधीकाळी रटाळ होते. दोन वेळचे अन्न मिळविण्याचा संघर्ष चालायचा. परिस्थितीशी झुंज देत हे खेळाडू फ्रेंचाईजींचा भाग बनले. त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली...

बालपणी दोघे चांगल्या कुटुंबात वाढले, पण पुढे परिस्थिती पालटली आणि पैशाची चणचण सुरू झाली. एका मुलाखातीत हार्दिकने सांगितले की, आम्हा दोघांनी एक कार खरेदी केली होती. मात्र आर्थिक स्थितीमुळे कारचे हप्ते भरणे कठीण झाले होते. बॅंकेकडून कार जप्त होऊ नये यासाठी आम्ही ती दडवून ठेवायचो. दोघांमध्ये उत्कृष्ट प्रतिभा असल्याने रणजी करंडकासाठी त्यांची निवड झाली. एका सामन्यासाठी दोघांना ७०-७० हजार मिळाले. यामुळे उत्साही झालेल्या पांड्या बंधूंनी पुढे क्रिकेटला करियर बनविण्याचा निर्धार केला. पुढे दोघांचीही आयपीएलसाठी संघात निवड झाली. त्या कारच्या हप्त्यांची परतफेड झाली, शिवाय नवीन कार देखील घरी आली. पहिल्यांदा मुंबई इंडियन्स चॅम्पियन बनले तेव्हा दोघांना ५० लाख रुपये मिळाले. अवघ्या तीन महिन्यांत आयुष्य बदलले.

रवी शास्त्री याने त्याचे नाव ‘नट्टू’असे ठेवले. नटराजनची कथा देखील तितकीच मर्मस्पर्शी आहे. पाच भावा-बहिणींमध्ये सर्वात मोठा नटराजन तामिळनाडूच्या सेलमजवळील दुर्गम अशा   चिन्नाप्पामापात्ति गावातील मुलगा. वडील एस. थांगारासू विणकर होते. आई रस्त्याच्या कडेला बसून काही वस्तू विकायची. २०१७ ला या वेगवान गोलंदाजामधील प्रतिभा राजस्थान रॉयल्स संघाने ओळखली.  त्याला फ्रेंचाईजीने तीन कोटी दिले. आता हैदराबादसाठी तो खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात त्याने स्वत:च्या कामगिरीद्वारे सर्वांचे लक्ष वेधले.

रवींद्र जडेजाला महेंद्रसिंह धोनी याने ‘सर’ ही उपाधी दिली, हा खेळाडू गुजरातच्या सौराष्ट्र भागातील नवागाव या अतिमागासलेल्या खेड्यातून आला. जडेजाचे बालपण फारच गरिबीत गेले. वडील अनिरुद्ध सुरक्षा रक्षक  होते.  तो लहान असताना एका अपघातात आई लता यांचे निधन झाले.  पत्नी गेल्यानंतर वडिलांना जडेजाच्या सरावाकडे लक्ष देणे कठीण होत होते.  रवींद्र स्वत: क्रिकेट सोडून सेनेत जाण्यास इच्छुक होता. कोच महेंद्र चौहान यांनी त्याच्यातील प्रतिभा ओळखली. त्यांनी जडेजाला घडविले.  विराट कोहलीचा समावेश असलेल्या त्याची १९ वर्षांखालील संघात त्याची निवड झाली. या संघाने विश्वविजेतेपद पटकाविले होते. जडेजामधील प्रतिभा पाहून त्याला राष्ट्रीय संघातही स्थान देण्यात आले. पाठोपाठ तो चेन्नई सुपरकिंग्जमध्ये आला. या संघात त्याला धोनीचा अत्यंत विश्वासू मानले जाते.

भारतीय वेगवान माऱ्याचा अग्रणी बनलेला मोहम्मद सिराज याचे वडील मोहम्मद गौस हैदराबादमध्ये ऑटोचालक होते. बालपण गरिबीत गेले. वडिलांचा मृत्यू झाला, त्यावेळी सिराज ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता.  वडिलांच्या मृत्यूनंतरही ऑस्ट्रेलियात संघासोबत राहून त्याने शानदार कामगिरी केली. सिराजने २०१६-१७ च्या रणजी मोसमात ४१ गडी बाद केले. या कामगिरीवर प्राभावित झालेल्या सनरायजर्सने त्याला दोन कोटी ६० लाख रुपयांमध्ये संघात घेतले. त्यानंतर तो आरसीबीकडे आला.

मूळचा उत्तर प्रदेशचा यशस्वी ११ व्या वर्षी मुंबईत आला. शाळेत जात असताना सायंकाळी पाणीपुरी विकून उदरनिर्वाह करायचा. घर नसल्याने तंबूत वास्तव्यास होता. जेवणाची व्यवस्था बाहेर व्हायची. क्रिकेटचे त्याला वेड होते. जाईल्स शील्डमध्ये तिहेरी शतक ठोकताच यशस्वीची मुंबई संघात निवड झाली. मुंबईकडून त्याने दमदार कामगिरी करताच आयपीएलमध्ये राजस्थानने त्याला निवडले. आयुष्यात कुणाचे भाग्य कसे फळफळेल याचा वेध घेणे कठीण असते. त्यामुळेच जान निसार अख्तर  लिहितात...     गम की अंधेरी रात में दिल को न बेक़रार कर, सुबह ज़रूर आएगी सुबह का इंतज़ार कर!

 

टॅग्स :आयपीएल २०२२क्रुणाल पांड्याहार्दिक पांड्या
Open in App