नवी दिल्ली : आयपीएलचा अंतिम सामना कुठे होणार याची चर्चा सुरू होती. अखेर यावर सोमवारी शिक्कामोर्तब झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) बैठकीत यंदाचा आयपीएलचा अंतिम सामना मुंबईत २४ मे रोजी खेळविण्यात येणार, असा निर्णय घेण्यात आला. याआधी हा सामना अहमदाबाद येथे होईल, अशी चर्चा होती.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी बैठकीनंतर माहिती दिली की, ‘आयपीएलच्या रात्रीच्या सामन्यांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सर्व सामने रात्री ८ वाजता होतील. हे सामने ७.३० वाजता व्हावेत, अशी चर्चा झाली. मात्र, तसा निर्णय झालेला नाही. यावर्षी केवळ पाच सामनेच ४ आणि ८ वाजल्यापासून होतील. तसेच, पहिल्यांदाच नोबॉलसाठी तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात येईल. आता स्पर्धेत पहिल्यांदाच मैदानावरील पंचांच्या जागी नोबॉलचा निर्णय तिसरा पंच घेईल.’ याआधी भारत-वेस्ट इंडिजदरम्यान मालिकेत हा प्रयोग करण्यात आला होता.
गांगुली पुढे म्हणाले की, ‘आयपीएल सुरू होण्यापूर्वी तीन दिवस आधी आयपीएल आॅलस्टार सामना होईल. हा सामना अहमदाबाद येथे होणार नाही; कारण तेथे स्टेडियमचे काम अजूनही सुरू आहे. या सामन्यातून उभा राहणारा आर्थिक निधी कुणाला द्यायचा? याबाबत अजून काही ठरले नाही.’
गांगुली अणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड यांच्यात झालेल्या बैठकीत एनसीएवर प्रथमच आहारतज्ज्ञ व बायोमॅकेनिक्स गोलंदाजी प्रशिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. (वृत्तसंस्था)
‘नवी समिती आफ्रिकेविरुद्धचा संघ निवडेल’
‘घरच्या मैदानावर मार्चमध्ये होणाºया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी नव्या अध्यक्षाच्या नेतृत्त्वाखालील निवड समिती भारतीय संघ निवडेल,’ अशी माहिती सौरव गांगुली यांनी दिली. नव्या समितीसाठी लक्ष्मण शिवरामकृष्णन, अजित आगरकर, राजेश चौहान व व्यंकटेश प्रसाद यांनी अर्ज भरले आहेत.