Join us

IPL: बीसीसीआयला घसघशीत कमाई करण्याची संधी; नव्या संघांंमुळे पैशांचा वर्षाव

बीसीसीआयने आयपीएलमधील दोन नव्या संघांसाठी निविदा काढल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 09:17 IST

Open in App

नवी दिल्ली : क्रिकेटविश्वातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) अतिरिक्त दोन संघांचा समावेश होणार आहे. या दोन नव्या संघांच्या समावेशानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) तब्बल ५ हजार कोटी रुपयांची घसघशीत कमाई होण्याची माहिती मिळाली आहे. आयपीएलमध्ये सध्या ८ संघांचा समावेश असून, पुढील वर्षी या स्पर्धेत १० संघ खेळतील. आयपीएल संचालन परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत संघाच्या लिलाव प्रक्रियेला अंतिम स्वरुप देण्यात आले आहे.

बीसीसीआयने आयपीएलमधील दोन नव्या संघांसाठी निविदा काढल्या आहेत. मंगळवारी बीसीसीआयने याबाबतीत एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे माहिती दिली. यानुसार ५ ऑक्टोबरदरम्यान निविदा आमंत्रण विकत घेता येऊ शकेल, असे सांगण्यात आले. बीसीसीआयच्या सुत्रांनुसार, ‘कोणतीही कंपनी १० लाख रुपयांच्या किमतीवर लिलाव कागदपत्रे विकत घेऊ शकते. सुरुवातीला दोन्ही नव्या संघांचे आधारमूल्य प्रत्येकी १,७०० कोटी रुपये इतके ठरविण्यात आहे.

आता ही किंमत प्रत्येकी २ हजार कोटी रुपये इतकी ठेवण्याचा निर्णय झाला आहे.’  आयपीएलच्या आर्थिक व्यवहाराकडे लक्ष ठेवणाऱ्या सुत्रांनी सांगितल्यानुसार लिलाव प्रक्रिया आखलेल्या योजनेनुसार पुढे गेल्यास बीसीसीआयला किमान ५ हजार कोटी रुपयांचा फायदा होईल. कारण अनेक कंपन्यांनी लिलाव प्रक्रियेसाठी उत्सुकता दर्शविली आहे. 

३ हजार कोटी उलाढाल असलेल्या कंपन्याच पात्र 

आयपीएलच्या पुढील सत्रात ७४ सामन्यांचे आयोजन होईल. त्यामुळे सर्वांनाच याचा फायदा होण्याची शक्यता आहे.  बीसीसीआयने पत्रकात म्हटले आहे की, ‘आयपीएलमधील प्रस्तावित दोन नव्या संघांपैकी एका संघाचा मालकी आणि संचालन अधिकार मिळवण्यासाठी निविदा प्रक्रियेद्वारे बोली स्वीकारण्यात येतील. बोली लावणाऱ्या प्रत्येक पक्षाला निविदा आमंत्रण विकत घ्यावे लागेल. यामध्ये नमूद केलेल्या अटी पूर्ण करणारे पक्षच लिलाव प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतील.  त्यामुळे स्पष्ट करण्यात येत आहे की, निविदा आमंत्रण विकत घेणारा कोणताही पक्ष थेट बोली लावण्यास पात्र ठरणार नाही.’ मिळालेल्या माहितीनुसार, ज्या कंपन्यांची वार्षिक उलाढाल तीन हजार कोटी रुपये किंवा त्याहून अधिक   असेल, अशाच कंपन्या लिलाव प्रक्रियेसाठी पात्र ठरू शकतील.

टॅग्स :बीसीसीआयआयपीएल २०२१
Open in App