आज अबू धाबीमध्ये सुरू असलेल्या आयपीएल २०२६ साठीच्या लिलावामध्ये काही धक्कादायक बोली लागताना दिसत आहेत. एकीकडे कॅमरून ग्रीन, महिशा पतिराना यांच्यासारख्या परदेशी खेळाडूंवर विक्रमी बोली लागल्या तर दुसरीकडे पृथ्वी शॉ, सरफराज खान यांच्यासारख्या धडाकेबाज खेळाडूंना सुरुवातीच्या फेरीत खरेदीदारही मिळाला नाही. याचदरम्यान, अकीब दार या नवोदित आणि यापूर्वी आयपीएलमध्ये फारशा चर्चेत नसलेल्या अष्टपैलू खेळाडूसाठी आयपीएलमधील संघांमध्ये चढाओढ रंगल्याचं दिसून आलं. अखेरीच दिल्ली कॅपिटल्सने अकीब नबी दार याला तब्बल ८ कोटी २० लाख रुपयांची बोली लावून संघात घेतलं.
दरम्यान, आता अकिब दार का खेळाडू कोण आणि तो कुठल्या संघाकडून खेळतो, याबाबत क्रिकेटप्रेमींच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. अकीब दार हा जम्मू काश्मीमधील अष्टपैलू खेळाडू असून, तो देशांतर्गत स्पर्धांमध्ये जम्मू काश्मीरच्या संघाकडून खेळतो. त्याच्याबाबत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार अकीब दार याने आतापर्यंत ३६ प्रथमश्रेणी, २९ लिस्ट ए आणि ३४ टी-२० सामने खेळलेले आहेत. गेल्या रणजी हंगामात अकिब याने ४४ बळी टिपले होते.
अकिब दार याने ३६ प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये १८.९१ च्या सरासरीने ८७० धावा काढल्या आहेत. तर गोलंदाजीमध्ये १२५ बळी टिपले आहेत. तर २९ लिस्ट ए सामन्यात ३५१ धावा काढल्या असून ४२ बळी मिळवले आहेत. टी-२० क्रिकेटमध्येही त्याने बऱ्यापैकी चमक दाखवली असून ३४ टी-२० सामन्यात १४१ धावा काढल्या आहेत, तर गोलंदाजीत ४३ बळी मिळवले आहेत. यावर्षी दुलिप करंडक स्पर्धेत नॉर्थ झोन आणि ईस्ट झोन यांच्यात झालेल्या एका सामन्यामध्ये अकिब जावेद याने भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन करत ४ चेंडूत ४ बळी टिपले होते.