R Ashwin, CSK vs RR, IPL Auction 2025: टी२० हा युवा खेळाडूंचा आणि फलंदाजांचा खेळ या दोनही धारणा मोडीत काढणारा खेळाडू म्हणजे भारतीय फिरकीपटू आर अश्विन. अश्विनने वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केले आहे. त्याचेच फळ त्याला आज लिलावात मिळाले. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज अशा दोन संघांनी अश्विनचे नाव पुढे येताच लिलावात उडी घेतली. चेन्नईकडून अश्विन बराच काळ खेळला, तर राजस्थानकडूनही त्याने अनेक पराक्रम केले. त्यामुळे अश्विनसाठी त्याच्या दोन जुन्या संघांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. सुरुवातीपासूनच राजस्थानला अश्विनला आपल्या संघात कायम ठेवायचे होते. पण चेन्नई संघानेही हार मानली नाही. अखेर २ कोटींची मूळ किंमत बोलीच्या रुपाने ९ कोटी ७५ लाखांवर जाऊन थांबली. त्यावेळी राजस्थानने बोलीतून माघार घेत धोनीच्या CSK कडे अश्विनला जाण्याचा मार्ग मोकळा केला.
आजच्या लिलाव प्रक्रियेतील पहिल्या दोन सत्रात चेन्नईचा संघ फारसा आक्रमकपणे उतरलेला दिसला नाही. केवळ आपला जुना सलामीवीर डेवॉन कॉन्वे याला २ कोटींच्या मूळ किमतीपासून बोली लावून ६ कोटी २५ लाखांना त्यांनी विकत घेतले. त्यासोबतच दुसरा सलामीवीर रचिन रवींद्र यालाही चेन्नईच्या संघाने ताफ्यात घेतले. त्याची मूळ किंमत दीड कोटी असताना त्याला ४ कोटींच्या बोलीसह RTM करत संघात घेतले. त्याशिवाय SRH ने रिलीज केलेल्या राहुल त्रिपाठीलाही CSKने संघात घेतले. त्यांची मूळ किंमत ७५ लाख होती. त्याला चेन्नईने ३ कोटी ४० लाखांना खरेदी केले.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज संघाने लिलावाआधी पाच खेळाडू रिटेन केले. गतवर्षीचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला १८ कोटींच्या सर्वोच्च किमतीत संघात कायम ठेवले. तसेच अष्टपैलू रवींद्र जाडेजालाही १८ कोटी देऊन रिटेन करण्यात आले. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना याला १३ कोटींना तर शिवम दुबेला १२ कोटींना संघात कायम ठेवले. याशिवाय, ५ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला महेंद्रसिंह धोनी याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून ४ कोटींना संघात रिटेन करण्यात आले.