Yuzvendra Chahal Punjab Kings, IPL Auction 2025 Players List: भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल याच्यावर यंदाच्या मेगालिलावात तुफान बोली लागली. अवघ्या २ कोटींच्या मूळ किमतीवर असलेल्या चहलला पंजाब किंग्ज संघाने तब्बल १८ कोटी रुपयांच्या बोलीसह आपल्या ताफ्यात घेतले. टी२० क्रिकेटमध्ये पाच बळी घेणारा युजवेंद्र चहल हा पहिला भारतीय फिरकीपटू होता. या रेकॉर्डनंतर आज IPL इतिहासातील सर्वात महागडा स्पिनर होण्याचा बहुमान युजवेंद्र चहलला मिळाला. २०१४ ते २०२१ या काळात चहल विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली RCB संघात खेळत होता. त्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाने त्याला आपल्या ताफ्यात घेतला. तीन वर्षे त्यांच्यासाठी दमदार कामगिरी केल्यानंतर यंदा त्याच्यावर मोठी बोली लागली.
प्रीती झिंटाच्या पंजाब किंग संघाने लिलावाआधी अतिशय धक्कादायक निर्णय घेत अनेक बड्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला. जास्तीत जास्त सहा खेळाडू रिटेन करण्याची मुभा असूनही पंजाबच्या संघाने लिलावाआधी केवळ दोन खेळाडूंना संघात कायम ठेवले. त्यापैकी शशांक सिंग याला ५ कोटी ५० लाखांच्या रकमेसह रिटेन करण्यात आले. तर सलामीवीर प्रभसीमरन सिंग याला अनकॅप्ड खेळाडू म्हणून ४ कोटींना रिटेन केले गेले.
आजपासून सुरु झालेल्या लिलाव प्रक्रियेतील टॉप ५ महागड्या खेळाडूंमध्ये युजवेंद्र चहलचा समावेश झाला. रिषभ पंतला २७ कोटी, श्रेयस अय्यरला २६.७५ कोटी, अर्शदीप सिंगला १८ कोटी तर जॉश बटलरला १५.७५ कोटी रुपयांची बोली मिळाली.