IPL Auction 2025 : आयपीएल मेगा लिलावात भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळत आहे. रिषभ पंत, श्रेयस अय्यर पाठोपाठ भारताचा युवा अष्टपैलू व्यंकटेश अय्यर हा देखील यंदाच्या मेगा लिलावात मालामाल झाला आहे. तो यंदाच्या हंगामातील तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. रिटेन रिलीजच्या खेळात शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने त्याला रिलीज केले होते. पण पुन्हा त्याला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी संघानं जीव तोडून प्रयत्न केल्याचा सीन पाहायला मिळाला. यासाठी त्यांना मोठी किंमतही मोजावी लागली. पाण्यासारखा पैसा ओतून त्यांनी या भिडूला पुन्हा आपल्या ताफ्यात घेतलं आहे. हा निर्णय कितपत योग्य तो येणारा काळच ठरवेल. पण त्याच्यावर लावण्यात आलेली मोठी बोली ही KKR ची स्मार्ट चाल आहे, हे अजिबात म्हणता येणार नाही.
शाहरुखच्या KKR नं अय्यरसाठी किती कोटी मोजले?
व्यंकटेश अय्यरनं केकेआरकडून लक्षवेधी कामगिरी केली आहे. पण ८ कोटींच्या या गड्याला संघानं रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता. यात आणखी २-३ कोटी अधिक पैसा खर्च करून त्याला पुन्हा ताफ्यात घेणं ठिक होते. पण अन्य फ्रँयाचझींनी दाखवलेल्या उत्सुकतेमुळे केकेआरला आपल्याच रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोठा डाव खेळावा लागला. त्याला पुन्हा संघात घेण्यासाठी SRK च्या KKR ला मोठी किंमत चुकवावी लागली. तब्बल २३.७५ कोटी रुपये मोजले. २०२० मध्ये व्यंकटेश अय्यरनं २० लाख या मूळ किंमतीसह आयपीएलमध्ये एन्ट्री मारली होती. कोलकाताच्या संघाने अनपेक्षितपणे या खेळाडूवर मोठी बोली लावल्याचे पाहायला मिळाले.