सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात सुरु असलेल्या मेगा लिलावातील दुसऱ्या दिवशी काही अनकॅप्ड खेळाडूंना मोठी लॉटरी लागल्याचे पाहायला मिळाले. या खेळाडूंच्या यादीत प्रियांश आर्या याचाही समावेश आहे. ३० लाख मूळ किंमत असलेल्या या खेळाडूसाठी प्रिती झिंटाच्या मालकीच्या पंजाब किंग्स संघानं तब्बल ३.८० कोटींसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं. कोण आहे प्रियांश आर्या? ज्याच्यासाठी PBKS संघानं पर्समधून एवढी मोठी रक्कम काढली? जाणून घेऊयात त्यामागची स्टोरी
युवीच्या तोऱ्यात केली होती बॅटिंग
प्रियांश आर्या हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून खेळतो. डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणारा हा खेळाडू उजव्या हाताने फिरकी गोलंदाजीही करतो. मेगा लिलावात त्याच्यावर बोली लावण्यासाठी दिल्लीच्या संघानेही पंजाबला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. पण हा खेळाडू काही DC च्या हाती लागला नाही. २३ वर्षीय प्रियांशनं दिल्ली प्रीमिअर लीग स्पर्धेत धमाकेदार खेळीनं लक्षवेधून घेतलं होते. त्याने युवीच्या खेळीची आठवण करुन देणारी खेळी करत खास रेकॉर्ड आपल्या नावे केला होता. एका ओव्हरमध्ये ६ षटकार त्याने मारले होते.
एका ओव्हरमध्ये ६ षटकार मारणारा तिसरा भारतीय खेळाडू आहे प्रियांश
दिल्ली प्रीमियर लीगमध्ये एका ओव्हरमध्ये ६ षटकार मारणारा तो पहिला खेळाडू आहे. एवढेच नाही तर अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय आहे. त्याच्याशिवाय युवराज सिंग आणि रवी शास्त्री यांनी एका ओव्हरमध्ये ६ षटकार मारल्याचे पाहायला मिळाले होते.