आयपीएल मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी कॅप्ड जलगती गोलंदाजांच्या यादीतून १ कोटीत नाव नोंदवलेल्या तुषार देशपांडेला ६.५० कोटी एवढा भाव मिळालाय. तुषार देशपांडे गत हंगामात चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातून खेळताना दिसला होता. चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने मेगा लिलावाआधी त्याला रिलीज केले होते. पुन्हा त्याला ताफ्यात घेण्यासाठी धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं डावही लावला. पण द्रविडच्या राजस्थान रॉयल्ससमोर त्यांचा निभाव काही लागला नाही.
आयपीएल पदार्पणात मूळ किंमत होती फक्त २० लाख
२०२० च्या हंगामाआधी दिल्ली डेअर डेविल्स संघानं या खेळाडूला २० लाख या मूळ किंमतीसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते. त्यानंतर याच किंमतीसह मुंबईतील कल्याणचा हा गडी चेन्नई एक्स्प्रेस होऊन धोनीच्या संघाकडून खेळताना दिसले. पदार्पणाच्या पहिल्या हंगामात दिल्ली संघाकडून खेळताना ५ सामन्यात त्याने ३ विकेट्स घेतल्या होत्या. चेन्नऊच्या संघात एन्ट्री झाल्यावर २०२२ च्या हंगामात फक्त त्याला दोन सामन्यातच संधी मिळाली. या हंगामात त्याच्या खात्यात फक्त एक विकेट होती. पण २०२३ मध्ये चेन्नई संघाकडून त्याने कमालीची कामगिरी किली. या हंगामात २१ विकेट्स घेत चेन्नई सुपर किंग्सला चॅम्पियन करण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला होता. गत हंगामात त्याच्या खात्यात १७ विकेट्स होत्या. मागील दोन हंगामाची कामगिरी पाहता चेन्नईचा संघ त्याला सोडेल असे वाटत नव्हते. त्यांनी तसा प्रयत्नही केला.
मेगा लिलावात १ कोटींचा प्राइज टॅग, लागली मोठी बोली
पुढच्या हंगामात तुषार देशपांडे हा राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून खेळताना दिसेल. नव्या संघानं कल्याणकराचं कल्याणंही झालंय, असं म्हणायला हरकत नाही. कारण मागील काही हंगामात फक्त २० कोटीसह खेळणाऱ्या आणि यंदाच्या मेगा लिलावात १ कोटी प्राइज टॅग असलेल्या या खेळाडूवर मेगा लिलावात ६.५० कोटी एवढी मोठी बोली लागली आहे.