आयपीएल मेगा लिलावाच्या दुसऱ्या मार्की सेटमध्ये मोहम्मद शमीचं नाव पहिल्या क्रमांकावर होते. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं भारताच्या जलगदती गोलंदाजावर ९.७५ कोटींची बोली लावली होती. गुजरात टायटन्सच्या संघाला RTM साठी वेळ देण्यात आला. पण यावेळेत सनरायझर्स हैदराबादच्या संघाने डाव साधला. काव्या मारन यांच्या मालकिच्या संघानं १० कोटींसह स्वस्तात मस्त शॉपिंग केली.
शमीचा पगार वाढला, SRH साठीही फायद्याचा सौदा
मोहम्मद शमी हा वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील दुखापतीनंतर भारतीय संघाबाहेर आहे. जवळपास वर्षभर क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर रणजी करंडक स्पर्धेतून त्याने दमदार कमबॅक केले होते. याआधीच्या हंगामात तो गुजरात टायटन्स संघाकडून खेळताना दिसला होता. आता तो हैदराबादच्या ताफ्यातून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. गुजरात टायटन्सकडून मागील काही हंगामात तो ६.२५ कोटींच्या पॅकेजसह खेळत होता. हैदराबादमधील एन्ट्रीसह त्याच्या पगारात मोठी वाढ झाली आहे. एवढेच नाही तर हैदराबादच्या संघाला १० कोटींमध्ये परफेक्ट गोलंदाज मिळाला आहे. हा त्यांच्यासाठी फायद्याचा सौदाच आहे.
सिराजला शमीपेक्षा अधिक भाव, गुजरातनं घेतलं ताफ्यात
भारतीय जलगगती गोलंदाज मोहम्मद शमीसाठी गुजरात टायटन्सनं डाव खेळल्याचे पाहायला मिळाले. १२.२५ कोटीसह त्यांनी सिराजला आपल्या ताफ्यात घेतलं.
IPL मेगा लिलावात देश विदेशातील खेळाडूंची गर्दी
इंडियन प्रीमियर लीगच्या २०२५ मध्ये होणाऱ्या मेगा लिलावासाठी देश विदेशातील एकूण १५७४ खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. यातील ५७४ खेळाडूंना शॉर्टलिस्ट करण्यात आले होते. अंतिम यादी निश्चित झाल्यानंतर सौरव नेत्रावळकर, जोफ्रा आर्चर आणि हार्दिक तामोरे यांचाही यादीत समावेश करण्यात आला होता. त्यामुळे लिलावातील खेळाडूंचा आकडा हा ३६७ भारतीय आणि २१० परदेशी खेळाडूंसह एकूण ५७७ असा झाला. २०१८ च्या लिलावानंतर पहिल्यांदाच मार्की प्लेयर्सची दोन गटात विभागणी करण्यात आल्याचेही यावेळी पाहायला मिळाले.