आयपीएल मेगा लिलावात मार्की प्लेयरच्या पहिल्या आणि दुसऱ्या गटात एकूण ५ परदेशी खेळाडूंचा समावेश होता. यातील काही खेळाडूंचा पगार वाढला तर स्टार्कसारख्या आयपीएलच्या इतिहासातील महागड्या खेळाडूचा प्राइज टॅग अगदी निम्म्यापेक्षा खाली घसरल्याचे पाहायला मिळाले. एक नजर टाकुयात मार्की प्लेयर्सच्या यादीतील कोणत्या परदेशी खेळाडूला किती भाव मिळाला? ते कोणत्या संघातून खेळताना दिसणार त्यासंदर्भातील खास स्टोरी
कगिसो रबाडाचा पगार १ कोटींनी वाढला
दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्टार जलगती गोलंदाज कगिसो रबाडावर २ कोटींसह मेगा लिलावात सहभागी झाला होता. गत हंगामात ९.२५ कोटी एवढ्या रक्कमेसह पंजाबकडून खेळताना दिसणारा हा खेळाडू १ कोटींच्या पगार वाढीसह गुजरात टायटन्सच्या ताफ्यात सामील झाला. त्याच्यासाठी गुजरातच्या संघानं १०.२५ कोटी रुपये मोजले. RCB नं लायम लिविंगस्टोनला केलं मालामाल
गुजरात टायटन्सच्या ताफ्यातून अवघ्या ३ कोटीत खेळणारा लायम लिविंगस्टोन रॉयल चॅलेंजर्सच्या ताफ्यात गेला आहे. RCB नं त्याच्यासाठी ७.५० कोटी मोजले आहेत.
किलर मिलरचा संघ बदलला अन् भावही मिळाला
गत हंगामात डेविड मिलर हा गुजरात टायटन्सच्या संघाकडून ३ कोटींमध्ये खेळताना दिसला होता. मेगा लिलावात लखनऊ सुपर जाएंट्सनं त्याच्यावर मोठी बोली लावली. ७.५० कोटीसह या संघाने या खेळाडूला आपल्या ताफ्यात घेतले. त्याचा भाव दुप्पट झाल्याचे दिसून येते. मिचेल स्टार्कचा भाव घसरला
आयपीएल २०२४ च्या हंगामात मिचेल स्टार्कसाठी कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं २४.७५ कोटी एवढी विक्रमी किंमत मोजली होती. पण यावेळी त्याचा भाव निम्म्यानं कमी झालाय. पुन्हा त्याची दिल्ली कॅपिटल्समध्ये घरवापसी झाली असून दिल्लीनं त्याला ११.७५ कोटी रुपयांसह आपल्या संघात घेतले आहे.
मार्की प्लेयरमधील महागडा खेळाडू
परदेशी मार्की प्लेयमध्ये जोस बटलर सर्वात महागडा खेळाडू ठरला. गत हंगामात राजस्थान रॉयल्सकडून १० कोटी रुपयांत खेळताना दिसलेल्या या खेळाडूसाठी गुजरात टायटन्सच्या संघानं १५. ७५ कोटी रुपये मोजले आहेत.