लखनऊ सुपर जाएंट्समधील नाट्यमय गोष्टी अन् स्वाभिमान जपत १८ कोटींची ऑफर नाकारणाऱ्या लोकेश राहुलला मेगा लिलावात कोण अन् किती भाव देणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. सौदी अरेबियातील जेद्दाह शहरातील IPL मेगा लिलावात २ कोटी या मूळ किंमतीसह तो सहभागी झाला होता. LSG च्या ऑफरचा विचार केला तर मेगा लिलावात या खेळाडूला ४ कोटींचा घाटा झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने त्याला १४ कोटींसह आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. तो या संघाचे नेतृत्व करतानाही दिसू शकतो. केएल राहुलसाठी RCB मोठा डाव खेळेल, अशी चर्चा होती. पण तो आता दिल्लीकर झाला आहे.
आयपीएलमधील पदार्णात १० लाख मिळाले
२०१३ मध्ये लोकेश राहुलनं १० लाख या मूळ किंमतीसह रॉयल चॅलेंजर्स संघाकडून IPL मधील आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती. पहिले तीन हंगाम तो याच रक्कमेसह RCB च्या ताफ्यातून खेळताना दिसले. २०१६ च्या हंगामात RCB च्या संघानं फायनल खेळली होती. या संघात लोकेश राहुलचाही समावेश होता. या हंगामात त्याचे पॅकेज १ कोटी होते. २०१७ मध्ये याच पॅकेजसह RCB नं त्याला रिटेन केले होते.
कॅप्टन्सीसह वाढत गेला भाव
२०१८ च्या हंगामात लोकेश राहुल पंजाबच्या ताफ्यात गेला. या संघानं त्याच्यासाठी ११ कोटी रुपये मोजले. एवढेच नाही तर कॅप्टन्सीही मिळाली. २०१८ ते २०२१ या कालावधीत त्याने या संघाकडून दमदार कामगिरी केली. पण त्याच्या नेतृत्वाखालील संघाला काही ट्रॉफीचं स्वप्न साकार करता आले नाही. २०२२ मध्ये लखनऊ सुपर जाएंट्स या नव्या संघाची आयपीएलमध्ये एन्ट्री झाली. या संघाने लोकेश राहलला १७ कोटी रुपयांच्या पॅकेजसह आपल्या ताफ्यात जोडले. २०२२ ते २०२४ केएल राहुल या संघाचा कॅप्टनही राहिला. पण आगामी हंगामा आधी त्याने संघ सोडण्याचा निर्णय घेतला.
लोकेश राहुल अन् LSG मालकांच्यातील वाद चांगलाच गाजला २०२४ च्या हंगामीतील एका सामन्यात संघ मालक संजीव गोएंका आणि लोकेश राहुल यांच्यात चांगलेच वाजले होते. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमान जपत लोकेस राहुलनं या संघानं दिलेली १८ कोटींच्या पॅकेजची ऑफर नाकारत लिलावात उतरण्याचा निर्णय़ घेतल्याची जोरदार चर्चाही रंगली होती.