Gujarat Titans Buys, IPL Auction 2025 Players Live : आगामी हंगामासाठी सुरु असलेल्या लिलाव प्रक्रियेत पहिल्या दोन सत्रात भारतीय खेळाडूंचा बोलबाला दिसून आला. रिषभ पंतला लखनौ सुपर जायंट्स संघाने २७ कोटींना खरेदी केले. तर श्रेयस अय्यरला पंजाब किंग्ज संघाने २६ कोटी ७५ लाखांच्या मोठ्या बोलीवर ताफ्यात दाखल करून घेतले. पहिल्या सत्रात १२ बड्या नावांचा समावेश होता. यातील ११ खेळाडू २ कोटींच्या मूळ किमतीचे तर एक खेळाडू दीड कोटींच्या मूळ किमतीचा होता. पंत, अय्यर, राहुल या खेळाडूंची लिलावाच्या महिनाभर आधीपासूनच तुफान चर्चा होती. अशा परिस्थितीत गुजरात टायटन्स संघाने शांतीत क्रांती करत ३ बड्या खेळाडूंना गपचूप आपल्या संघात घेतले.
गुजरात टायटन्सच्या संघात ३ 'मॅचविनर'
गुजरात टायटन्स संघाने जोश बटलरवर बोली लावली. बटलरची राजस्थान रॉयल्समधली कारकीर्द खूपच जोरदार होती. त्यामुळे जोश बटलरवर मोठी बोली लागेल, असा अंदाज होता. त्यानुसार बोली लागायला सुरुवात झाली आणि गुजरात संघाने त्याला १५ कोटी ७५ लाखांच्या बोलीसह संघात घेतले. त्याखालोखाल मोहम्मद सिराजला चांगला भाव मिळेल असाही अंदाज होता. त्या तुलनेत गुजरात संघाने त्याला १२ कोटी २५ लाखांच्या स्वस्तातल्या बोलीत ताफ्यात सामील केले. याशिवाय कगिसो रबाडा या वेगवान गोलंदाजालाही त्याने केवळ १० कोटी ७५ लाखांच्या बोलीसह संघात सामील करून घेतले.
-----
-----
गुजरात टायटन्सने लिलावाआधी पाच खेळाडू रिटेन केले होते. त्यांनी राशिद खानला सर्वाधिक १८ कोटीना संघात कायम ठेवले. पाठोपाठ कर्णधार शुबमन गिलला देखील १६ कोटी ५० लाखांच्या किमतीसह रिटेन केले. तसेच साई सुदर्शनला ८ कोटी ५० लाख रुपये देत संघात कायम ठेवले. याशिवाय, राहुल तेवातिया आणि शाहरूख खान या दोन अनकॅप्ड खेळाडूंना प्रत्येकी ४-४ कोटींच्या रकमेसह रिटेन करण्यात आले. त्यात आता या ३ खेळाडूंची भर पडल्याने संघ चांगलाच मजबूत झाला आहे.