ठळक मुद्देआयपीएलचा लिलाव 18 डिसेंबरला जयपूर येथे50 भारतीय व 20 परदेशी खेळाडूंसाठी चढाओढयुवराज सिंगची मुळ किंमत घसरली
मुंबई, आयपीएल लिलाव 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 2019च्या हंगामासाठी येत्या 18 डिसेंबरला जयपूर येथे खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या लिलावासाठी 50 भारतीय आणि 20 परदेशी अशा एकूण 70 खेळाडूंवर बोली लागणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने करारमुक्त केलेला युवराज सिंगलाही या लिलाव प्रक्रियेतून जावे लागणार आहे. या लिलाव प्रक्रियेत भारताचा स्फोटक फलंदाज युवराजचा भाव घसरल्याचे निदर्शनास आले आहे. पंजाबने गत मोसमात त्याला 2 कोटीच्या मुळ किमतीत संघात दाखल करून घेतले होते, परंतु यंदा त्याची मुळ किंमत 1 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे.
या लिलाव प्रक्रियेतून ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेल आणि अॅरोन फिंच यांनी माघार घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा व्यग्र वेळापत्रकामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. तसेच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी 2019 मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले आहे. भारतीयांमध्ये युवराजची मुळ किंमत 1 कोटी करण्यात आली आहे. त्याशिवाय मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि वृद्धीमान साहा यांचीही मुळ किंमत 1 कोटी आहे. गतवर्षी सर्वाधिक 11.5 कोटी रुपयांत राजस्थान रॉयल्सच्या चमूत दाखल झालेल्या जयदेव उनाडकतची मुळ किंमत यंदा 1.5 कोटी आहे.
दोन कोटींच्या क्लबमध्ये इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन व ख्रिस वोक्स, न्यूझीलंडचा कोरी अँडरसन व ब्रेंडन मॅकलम्, दक्षिण आफ्रिकेचा कॉलीन इंग्राम, श्रीलंकेचा लसिथ मलिंगा व अँजेलो मॅथ्यू, व ऑस्ट्रेलियाच्या डी'अॅर्सी शॉर्टचा समावेश आहे.