मुंबई, आयपीएल लिलाव 2019 : भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज युवराज सिंगला आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने एक कोटीच्या मूळ किमतीत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. मुंबई संघाने निवड केल्यानंतर युवराज आनंदित झाला आणि त्याने कर्णधार रोहित शर्माच्या नावावर विशेष ट्विट केले. त्या ट्विटनंतर रोहितनेही युवीचे जोरदार स्वागत केले.
रोहितने ट्विटमध्ये लिहिले की,'' नायकांच्या शहरांमध्ये युवराज तुझे स्वागत.'' त्याआधी युवराजने ट्विटरवर लिहीले होते की,''मुंबई इंडियन्स कुटुंबाचा सदस्य झाल्याचा आनंद आहे. 2019च्या मोसमाची आतुरतेने वाट पाहत आहे. रोहित शर्मा लवकरच भेटू.''
जयपूर येथे मंगळवारी पार पडलेल्या लिलावाच्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई इंडियन्सने युवीला एक कोटी मूळ किंमतीत आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. मात्र, पहिल्या टप्प्यात त्याला आपल्या चमूत घेण्यासाठी एकाही संघाने उत्सुकता दाखवली नाही. 2015 मध्ये युवराजला 16 कोटी रुपये मिळाले होते. युवराज याआधी दिल्ली डेअरडेव्हिल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद, पुणे वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांकडून खेळला आहे.