मुंबई, आयपीएल लिलाव 2019 : आयपीएलच्या 2019 च्या हंगामात अनेक परदेशी स्टार खेळाडू निम्म्यावर डाव सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट खेळाडूंनी तर माघारही घेतली आहे. आठ संघात मिळून 70 जागांसाठी जवळपास 346 खेळाडूंवर आज बोली लावली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचे तडाखेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आणि ॲरोन फिंच यांनी आयपीएल 2019 मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षात ऑस्ट्रेलियाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे त्यांनी लिलाव प्रक्रियेतून माघार घेतली आहे.
2019 च्या विश्वचषक स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता काही देशांनी आपापल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यासाठीची डेडलाईन ठरवली आहे. त्यामुळे बरेच परदेशी खेळाडू आयपीएलचा डाव अर्ध्यावरच सोडून जाऊ शकतात. 30 मे ला विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे.
जाणून घ्या प्रत्येक देशाची डेडलाईन बांगलादेश - 15 एप्रिल; इंग्लंड -25 एप्रिल ( फक्त वर्ल्ड कप संघातील सदस्यांना); आयर्लंड -30 एप्रिल ( वर्ल्ड कपसाठी नाही); ऑस्ट्रेलिया - 2 मे; श्रीलंका - 6 मे; दक्षिण आफ्रिका - 10 मे.
अफगाणिस्तान संघाने आयपीएलमधून माघार घेण्याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड संघाने त्यांच्या खेळाडूंना आयपीएलचा संपूर्ण हंगाम खेळण्याची मुभा दिलेली आहे.