Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं

फक्त मला १ चेंडू टाकू द्या असं तो वारंवार आयोजकांकडे विनवणी करू लागला. मग आयोजकांनीही त्याची विनंती स्वीकारली आणि त्याला एक चेंडू टाकण्याची संधी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 13:23 IST

Open in App

आयपीएल हे असं व्यासपीठ आहे, जिथे खेळाडू तयार होतात. त्यांच्या प्रतिभेला नवी ओळख मिळते. गुजरात टायटन्सकडून खेळणारा अशोक शर्मा हा असाच एक खेळाडू आहे. राजस्थान रॉयल्सविरोधात ४ एप्रिलच्या सामन्यात गुजरात टायटन्सला भलेही पराभवाचा सामना करावा लागला असेल परंतु या सामन्यात अशोक शर्माने त्याची छाप पाडली आहे. सर्वात वेगवान चेंडू फेकणारा अशोक शर्मा अशी त्याला ओळख मिळाली. या चेंडूचा वेग १५४.७ किमी प्रतितास इतका होता. आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान गोलंगाजी करणाऱ्या यादीत अशोक शर्मा थेट टॉपवर पोहचला. अशोक शर्माची ताकद त्याच्या चेंडूचा वेग आणि अचूकतेमध्ये आहे. ज्यामध्ये तो खूप सातत्यपूर्ण दिसतो.

क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला निघाला

आयपीएल २०२६ मध्ये आपल्या खेळीने अनेकांचे लक्ष वेधून घेणारा अशोक शर्माचा प्रवास इतका सहज नव्हता. हा असा खेळाडू आहे ज्याने ३ वर्षापूर्वी क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता. U-23 मध्ये संधी मिळाली नाही म्हणून नाराज झालेला अशोक सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागला. वडिलांसोबत शेताच्या कामात हातभार लावू लागला. त्याचवेळी या शेतकरी पुत्राच्या क्रिकेट करिअरसाठी टॅलेंट हंट संजीवनी म्हणून पुढे आली. क्रिकेट सोडण्याचा विचार बनवलेल्या अशोक शर्माला जेव्हा टॅलेंट हंटबाबत कळाले तेव्हा त्याने यात प्रयत्न करून पाहायचे ठरवले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. टँलेंट हंटमध्ये त्याला रजिस्ट्रेशन करता आले नाही. तरीही कसबसं अशोकने या स्पर्धेच्या आयोजकांकडे १ चेंडू टाकायला देण्याची विनंती केली. फक्त मला १ चेंडू टाकू द्या असं तो वारंवार आयोजकांकडे विनवणी करू लागला. मग आयोजकांनीही त्याची विनंती स्वीकारली आणि त्याला एक चेंडू टाकण्याची संधी दिली.

पायात चप्पल घालून टाकला चेंडू

ही संधी मिळाली तेव्हा अशोक शर्माच्या पायात चप्पल होती. त्याने बूट घातले नव्हते. परंतु त्याची पर्वा न करता अशोकने चप्पलमध्येच चेंडू टाकण्याचा निर्णय घेतला. चप्पल घातलेल्या अशोकने १४० किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला आणि तिथूनच त्याचे आयुष्य बदलले. क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करण्याचा विचार करणाऱ्या अशोक शर्माने त्या एका घटनेनंतर मागे वळून पाहिलेच नाही. त्याने २०२५-२६ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील १० ग्रुप सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेत स्पर्धेच्या ग्रुप पातळीत सर्वाधिक बळी घेण्याचा दशकांपूर्वीचा विक्रम मोडला.

नेहरानं दिली आयपीएलमध्ये संधी

दरम्यान, आयपीएलमध्ये पडद्यामागून गुजरात टायटन्सची सूत्रे हलवणाऱ्या आशिष  नेहरानं अशोक शर्मावर डाव लावला. ९० लाख रुपयांसह त्याला GT नं आपल्या ताफ्यात घेतलं. पंजाब विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याला पदार्पणाची संधीही देण्यात आली. या सामन्यात त्याने १ विकेट्स घेत आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवली. आता राजस्थानविरुद्ध त्याने यंदाच्या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकताना ४ षटकांच्या कोट्यात ३७ धावा खर्च करून एक विकेट आपल्या खात्यात जमा केल्याचे पाहायला मिळाले. अशोकनं आतापर्यंत ११ टी २० सामने खेळले असून यात ३३ विकेट्स मिळवल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : From Government Job Aspirant to IPL Star: Ashok Sharma's Inspiring Journey

Web Summary : Ashok Sharma, once set for a government job, is now an IPL sensation. Disheartened by cricket rejections, a talent hunt reignited his passion. He impressed with a 140 kmph delivery in chappals, leading to IPL success with Gujarat Titans. Now he bowls at 154.7 kmph.
टॅग्स :आयपीएल २०२६गुजरात टायटन्सआशिष नेहरा