गतवर्षी झालेल्या आयपीएलच्या १८ व्या हंगामात लखनौ सुपरजायंट्स सरकारने मोठा गाजावाजा करून आणि लिलावात तब्बल २७ कोटी रुपयांची बोली लावून संघात घेतलेला रिषभ पंत सपशेल अपयशी ठरला होता. रिषभ पंतचं हे अपयश संघाचे मालक संजीव गोयंका यांच्या जिव्हारी लागलं होतं. त्यामुळेच आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी रिषभ पंत हा लखनौचा संघ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता या चर्चांवर स्वत: संघमालक संजीव गोयंका यांनी उत्तर दिलं आहे.
रिषभ पंत लखनौचा संघ सोडणार असल्याच्या चर्चांवर उत्तर देताना संजीव गोयंका म्हणाले की, रिषभ पंत हा लखनौ सुपरजायंट्सचा संघ सोडणार नाही. आयपीएलला सुरुवात झाल्यावर मी सोशल मीडियासाठी पंचिंग बॅग बनतो. रिषभ पंत लखनौच्या संघात राहणार की नाही याबाबत लोक सातत्याने तर्कवितर्क लढवत असतात. मी यावर केवळ हसतो. काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना केवळ व्ह्यूज हव्या असतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
आयपीएल २०२५ मध्ये सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक असलेल्या रिषभ पंतची कामगिरी अपेक्षित अशी झाली नव्हती. हंगामातील १४ सामन्यांत मिळून त्याला केवळ २६९ धावाच जमवता आल्या होत्या. त्याशिवाय लखनौचा संघ १० संघांमध्ये सातव्या क्रमांकावर राहिल्याने रिषभ पंतची कप्तानीही टीकेचा विषय ठरली होती. वेगवान गोलंदाजांना झालेल्या दुखापती लखनौच्या संघासाठी नुकसानकारक ठरले होते. यावरून संजीव गोयंका यांनी रिषभ पंतचा बचाव केला. ते म्हणाले की, जर कुठल्या कर्णधाराकडे चार वेगवान गोलंदाजच नसतील तर तो काय करेल. तुम्हाला परिस्थिती पाहावी लागेल. मला रिषभ पंत याच्यावर पूर्ण विश्वास आहे.