हैदराबादच्या घरच्या मैदानात पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खराब झाली. राजस्थान रॉयल्सचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चरने पहिल्याच चेंडूवर अभिषेक शर्माला तंबूचा रस्ता दाखवला. जोफ्रा आर्चरनं सलग दुसऱ्या सामन्यात पहिल्या चेंडूवर प्रतिस्पर्धी संघाला धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. याआधी जोफ्रानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात टिम डेविडला आल्या पावली माघारी धाडले होते. आता अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की ओढावली. या सामन्यात पदरी भोपळा पडल्यावर अभिषेक शर्माच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. शून्यावर बाद होण्याची त्याची आकडेवारी "चला तो चाँद तक, नहीं तो शाम तक..." असे चित्र निर्माण करणारी आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्याच चेंडूवर तुटून पडण्याचा डाव फसला अन्...
अभिषेक शर्मा हा पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांवर तुटून पडतो. बऱ्याचदा हा डाव त्याच्या अंगलट आला आहे. जोफ्रा आर्चरसमोर देखील तेच घडलं. पहिल्याच चेंडूवर त्याने पुढे येऊन थर्ड मॅनच्या दिशेनं मोठा फटका खेळला. रवी बिश्नोईन कोणतीही चूक न करता त्याचा झेल पकडला अन् त्याला तंबूचा रस्ता धरावा लागला. अभिषेक शर्मा टी-२० क्रिकेटमध्ये यंदाच्या वर्षात सातव्यांदा शून्यावर बाद झाला. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत तो सलग तीन वेळा शून्यावर बाद झाल्याचे पाहायला मिळाले होते.
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
रोहित आणि संजूचा नकोसा विक्रम मोडला
टी-२० क्रिकेटमध्ये अभिषेक शर्मा एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी रोहित शर्मा आणि संजू सॅमसन या यादीत अव्वलस्थानी होती. रोहित शर्मा २०१८ मध्ये तर संजू सॅमसन २०२४ च्या कॅलेंडर ईयरमध्ये ६ वेळा शून्यावर बाद झाला होता. अभिषेक शर्मानं सातव्यांदा शून्यावर बाद होत या दिग्गजांना मागे टाकत अभिषेक नको त्या यादीत अव्वलस्थानी पोहचला आहे. पाचवेळा तो आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात शून्यावर बाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
टी २० मध्ये एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे भारतीय
७ - अभिषेक शर्मा, २०१६ (१८ डावात)
६ - रोहित शर्मा, २०१८ (३२ डावात)
६ - संजू सॅमसन, २०२४ (३२ डावात)
५ - गुरकीरत सिंह मान, २०१३ (१९ डावात)