आयपीएल २०२६ च्या हंगामात धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या पंजाब किंग्जला सलग तीन सामन्यांत पराभवाचे तोंड पाहावे लागले. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यातही पंजाबला पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर पंजाबचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांचा संयम सुटला असून त्यांनी खराब क्षेत्ररक्षणावरून खेळाडूंची चांगलीच कानउघडणी केली आहे.
हैदराबादने दिलेल्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबचा संघ दबावाखाली दिसला आणि एकापाठोपाठ एक विकेट्स गमावत गेला. मात्र, पराभवाचे मुख्य कारण फलंदाजी नसून खराब फिल्डिंग असल्याचे रिकी पॉन्टिंग यांनी स्पष्ट केले. रिकी पॉन्टिंग यांनी शशांक सिंहवर निशाणा साधला आहे. सामन्यानंतर बोलताना पॉन्टिंग म्हणाले की, "आम्ही अत्यंत खराब फिल्डिंग करत आहोत. गेल्या दोन-तीन सामन्यांपासून शशांक सिंह जिथे क्षेत्ररक्षण करतोय, बॉल तिथेच जात आहे आणि तो सोपे झेल सोडत आहे. जर आपण असेच झेल सोडत राहिलो, तर सामने जिंकणे अशक्य आहे. प्रत्येक संधीचे रूपांतर विकेटमध्ये करणे आवश्यक आहे."
कर्णधार श्रेयस अय्यरही नाराज
केवळ प्रशिक्षकच नाही, तर पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरनेही क्षेत्ररक्षणावर आपली नाराजी व्यक्त केली. अय्यर म्हणाला की, "अशा प्रकारचा पराभव स्वीकारणे कठीण आहे. टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल संघांविरुद्ध खेळताना सोपे झेल सोडणे अस्वीकार्य आहे. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, पण क्षेत्ररक्षकांनी त्यांना साथ दिली नाही. गमावलेल्या संधींमुळेच आम्हाला हा सामना गमवावा लागला."
'तो' झेल ठरला सामन्याचा टर्निंग पॉईंट
हैदराबादच्या डावातील ९ व्या षटकात युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर हेनरिक क्लासेनने एक स्वीप शॉट खेळला. चेंडू हवेत उडाला आणि सीमारेषेजवळ असलेल्या शशांक सिंहकडे सोपा झेल गेला. मात्र, शशांकने ही संधी गमावली. त्यावेळी क्लासेन स्वस्तात बाद झाला असता, तर सामन्याचे चित्र वेगळे असते. या जीवदानाचा फायदा घेत क्लासेनने ४३ चेंडूत ६९ धावांची तुफानी खेळी केली, जी पंजाबच्या पराभवाला कारणीभूत ठरली.
Web Summary : Punjab Kings face losing streak. Coach Ponting blames poor fielding, singling out Shashank Singh for dropped catches. Captain Iyer echoed the sentiment, citing missed opportunities led to defeat against Hyderabad. Klassen's dropped catch proved costly.
Web Summary : पंजाब किंग्स लगातार हार का सामना कर रही है। कोच पोंटिंग ने खराब फील्डिंग को दोषी ठहराया, शशांक सिंह पर कैच छोड़ने का आरोप लगाया। कप्तान अय्यर ने भी यही बात कही, कहा कि छूटे अवसरों से हैदराबाद के खिलाफ हार हुई। क्लासेन का कैच छोड़ना महंगा साबित हुआ।